ॲपलने काल झालेल्या कार्यक्रमात बरीच नवी उत्पादने सादर केली असून यामध्ये iMac, iPad Pro, Apple AirTags, Apple TV ची नवी आवृत्ती यांचा समावेश आहे.
यामधील AirTag हे छोटंसं उपकरण प्रथमच सादर करण्यात आलं आहे. हे कीचेन, बॅग, सायकल अशा प्रकारच्या वस्तूंना जोडता येतं आणि त्यानंतर आपण त्या त्या टॅगला नाव देऊन ती ती वस्तु ट्रॅक करू शकता! यासाठी तुम्हाला तुमचा फोन दिशा दाखवत मदत करेल. जर हा टॅग हरवला तर तो शोधण्यासाठीही तुमचा फोन आणि ॲपलची स्मार्ट सिस्टम मदत करेल.
याची किंमत ऐकून मात्र ॲपलच्या बऱ्याच उत्पादनांबद्दल पडणारा प्रश्न पुढे येतो की या एव्हढया गोष्टीसाठी $29 म्हणजे भारतात ३१९० रुपये कसे काय द्यायचे? चार टॅग घेतल्यावर किंमत $99 म्हणजे १०९०० रुपये! ॲपलने काही ब्रॅंड्स सोबत भागीदारी केली आहे आणि त्यांचे टॅग तर केवळ त्या ब्रॅंडच्या नावासाठी तब्बल $449 म्हणजे जवळपास ३४००० रुपयांना मिळतील! २२०० आणि ३४००० दोन्हीही टॅग काम तेच करणार आहेत तरीही…!
या AirTag सोबत त्यांनी नवा Apple TV आणला आहे. सोबत याचा रिमोटसुद्धा आता नव्या डिझाईनसह मिळेल. यामध्ये आता A12 चीप दिलेली आहे. याची किंमत $179 (भारतात १८९००) इतकी असणार आहे.
पॉडकास्ट मध्येही अपडेट देऊन आता क्रिएटर्सना पैसे देता येतील अशीही सोय देण्यात आली आहे. ॲपल कार्ड साठी आता ॲपल कार्ड फॅमिलीचाही पर्याय असेल ज्याद्वारे आपले कुटुंबीयसुद्धा हे डिजिटल कार्ड वापरू शकतील!