पुस्तके ऑनलाइन विकण्यासाठी सुरुवात झालेल्या ॲमेझॉनला जगातली आघाडीची कंपनी बनवून आता २०२१ च्या शेवटी ॲमेझॉन संस्थापक जेफ बेझोस (Jeff Bezos) सीईओ पदाचा राजीनामा देणार आहेत असं काल जाहीर करण्यात आलं आहे. १९९४ पासून २०२१ पर्यंत ॲमेझॉनचे प्रमुख असलेले जेफ बेझोस सीईओ पद सोडणार असून त्यांच्या जागी सध्या AWS (ॲमेझॉन वेब सर्विसेस)चे सीईओ असलेले अँडी जॅसी (Andy Jassy) यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
ॲमेझॉन आता अनेक देशात पसरलेली सर्वात मोठी ऑनलाईन शॉपिंग वेबसाईट असून त्यांचं आता १.७ ट्रिलियन डॉलर्सचं भलं मोठं बाजारमूल्य आहे. एव्हढ्या मोठ्या कंपनीचा निर्माता म्हणून २७ वर्षे कार्यभार जेफ बेझोस यांनी सांभाळला. काही महिन्यांपूर्वीच त्यांनी अनेक वर्षं सर्वात श्रीमंत असणाऱ्या बिल गेट्सना मागे टाकत जगात सर्वात श्रीमंत बनण्याचा बहुमानसुद्धा मिळवला होता. (काही दिवसांपूर्वी इलॉन मस्कने त्यांना मागे टाकलं आहे). जेफ यांकडे त्यांच्या कारकिर्दीत ॲमेझॉन, ट्वीच, IMDb, Whole Foods, Washington Post, Blue Origin, Zappos, Alexa, DPReview, Fabric.com, Goodreads, Audible अशा काही स्वतःच्या तर काहींचं अधिग्रहण केलेल्या कंपन्यांची मालकी आहे!
ते सीईओपदाचा राजीनामा देत असले तरी कंपनीवरच्या नियंत्रणात फरक पडणार नाही असं दिसत आहे. त्यांचा कंपनीमध्ये १०.६ टक्के हिस्सा असून ते बोर्ड ऑफ डायरेक्टर्सचे सदस्य आहेतच. सगळ्यात मोठे शेयरहोल्डर असल्यामुळे साहजिकच सूत्र त्यांच्याच हाती राहतील फक्त ॲमेझॉनमधील दैनंदित कामातून त्यांना इतर गोष्टींसाठी वेळ काढता येईल. त्यांनी आता नवी उत्पादने आणि इतर उपक्रमांकडे लक्ष देणार असल्याचं जाहीर केलं आहे. Day 1 Fund, the Bezos Earth Fund, Blue Origin, The Washington Post आणि इतर संस्थांकडे वेळ देण्यासाठी हा निर्णय घेतला असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.