व्हॉट्सॲपने यूजर्सच्या नाराजीनंतर प्रायव्हसी पॉलिसीचा बदल पुढे ढकलला!

व्हॉट्सॲपने काही दिवसांपूर्वी जाहीर केलेली प्रायव्हसी पॉलिसी तूर्तास लागू करणार नसून ८ फेब्रुवारी नंतरही तुम्ही नवी पॉलिसी Agree केली नाही तरी तुमचं अकाऊंट बंद होणार नाही. फेसबुक कंपनीने व्हॉट्सॲप यूजर्सचा डेटा कसा वापरला जाईल, बिझनेसेस फेसबुकच्या सेवांचा वापर करुन चॅट्स कसे साठवू शकतील आणि इतर उत्पादनामध्ये वापरू शकतील, मेसेंजरमध्ये कशा प्रकारे शेयर केला जाईल ही माहिती दिली होती. मात्र हा डेटा शेयर करण्याला अनेकांनी विरोध दर्शवत सिग्नल, टेलिग्रामकडे वळण्यास सुरुवात केली आणि यामुळेच ताळ्यावर येत व्हॉट्सॲपने आपला निर्णय पुढे ढकलला आहे.

व्हॉट्सॲपचं अधिकृत स्पष्टीकरण : blog.whatsapp.com/giving-more-time-for-our-recent-update

ADVERTISEMENT

व्हॉट्सॲप तुमच्या प्रायव्हसीची काळजी करतं अशा आशयाच्या जाहिराती पेपरमध्ये देण्यात आल्या आहेत. शिवाय स्वतः व्हॉट्सॲपने आज स्टेट्स लावून तशी माहिती दिली आहे. मात्र हे सगळं झाल्यावर आता त्यांच्यावर विश्वास कसा ठेवायचा हा प्रश्न उरतोच. ८ फेब्रुवारी ऐवजी १५ मे २०२१ पासून ही पॉलिसी अंमलात आणली जाईल आणि हा वेळ यूजर्समधील संभ्रम दूर करण्यासाठी वापरला जाईल असं सांगण्यात आलं आहे. यावरून असा निष्कर्ष काढता येईल की त्यांच्या अपेक्षित होता त्यापेक्षा जास्तच प्रमाणात विरोध यूजर्सकडून झालेला आहे.

खरेतर त्यांनी हा बदल करण्याचा निर्णय पूर्णपणे मागे घेणं अपेक्षित होतं मात्र त्यांनी सध्या फक्त निर्णय पुढे ढकलला आहे. त्यामुळे तुम्ही जर आधीच सिग्नल किंवा टेलिग्राम वापरण्यास सुरुवात केली असेल आणि तुमच्या संपर्कातील इतरांनाही सोबत घेत असाल तर ते सुरू ठेवा.

Exit mobile version