गेले काही दिवस चर्चा असलेली बातमी आज अधिकृत झाली असून सेल्सफोर्स (SalesForce) कंपनीने स्लॅक (Slack) कंपनीला विकत घेतलं आहे. हा व्यवहार तब्बल 27.7 बिलियन डॉलर्स म्हणजे जवळपास दोन लाख कोटी रुपयांना झाला असल्याचं सांगण्यात आलं आहे.
कार्यालयीन कामाच्या नियोजनासाठी कंपन्यांकडून मोठ्या प्रमाणात वापरल्या जाणार्या ‘स्लॅक‘ या सेवेचा तब्बल १ कोटी यूजर्सकडून रोज वापर केला आहे! (२०१९ मधील माहितीनुसार) स्लॅक आता कंपनीमधील कर्मचार्यांच्या कामासंबंधित चर्चेसाठी उत्तम साधन बनलं आहे.
स्लॅकला आता सेल्सफोर्सच्या Salesforce Customer 360 सोबत जोडलं जाणार असून त्यांच्या क्लाऊड सेवेमध्येही समाविष्ट केलं जाईल.
स्लॅकची २०१५ पासून नेहमीच वाढ होत राहिली आहे. लाखो युजर्सची यामध्ये रोज भर पडत असून वापरण्यास सोपी आणि सुटसुटीत रचना यामुळे कंपनी, कर्मचारी यांचा स्लॅक वापरण्याकडे ओढा दिसून येत आहे. स्लॅकची सुरुवात स्टेवर्ट बटरफिल्ड यांनी त्यांच्या Tiny Speck या गेम कंपनीच्या अंतर्गत कामासाठी केली होती. होय हा एका कंपनीचा अंतर्गत प्रकल्प आता सॉफ्टवेअरच्या रूपात जगभर वापरला जातोय! Slack हे नाव Searchable Log of All Conversation and Knowledge चं संक्षिप्त रूप आहे!
कोरोनाच्या काळात सर्व कंपन्यानी वर्क फ्रॉम होम स्वीकारलं आणि स्लॅकचा वापर अनेक पटींनी वाढला आहे. सध्या त्यांची मुख्य स्पर्धा असलेल्या मायक्रोसॉफ्ट टीम्सला त्यांना अधिक चांगल्या प्रकारे लढत देता येईल. मायक्रोसॉफ्टसारख्या मोठ्या कंपनीमुळे अलीकडे त्यांना काही प्रमाणात फटका नक्कीच बसत होता. Salesforce ही क्लाऊड आधारित बिझनेस सेवा पुरवणारी कंपनी आता स्लॅकला आणखी पुढे घेऊन जाईल असं मत त्यांच्या सीईओने व्यक्त केलं आहे.