मायक्रोसॉफ्टने त्यांच्या विंडोज १० या ऑपरेटिंग सिस्टमसाठीचं नवं अपडेट आता उपलब्ध करून देण्यास सुरुवात केली असून नव्या अपडेटचं नाव Windows 10 October Update 2020 (20H2) असं असणार आहे. यामध्ये आता आपल्या थीमनुसार स्टार्ट मेन्यूच्या टाईल्स मधील रंग बदलणे, नवा मायक्रोसॉफ्ट एज, टॅब्लेटसाठी काही नवे पर्याय अशा सुविधा देण्यात आल्या आहेत. ह्या अपडेटमध्ये मोठा बदल पाहायला मिळणार नाही.
स्टार्ट मेन्यू मधील थीमनुसार टाईल्स ही सुविधा अशी आहे जिची यूजर्स अनेक महीने वाट पाहत आहेत. यामुळे तुम्ही सेट केलेल्या थीम/वॉलपेपरनुसार इतर ठिकाणच्या रंगांसोबत स्टार्ट मेन्यूमधील सर्व टाईल्सही रंग बदलतील! Settings > Personalization > Color इथे तुम्ही नव्या बदलासंबंधी पर्याय पाहू शकाल.
नव्या अपडेटमध्ये मायक्रोसॉफ्टचा नवा क्रोमियम आधारित ब्राऊजर एज आधीपासून देण्यात आला आहे. यापूर्वी हा डाउनलोड करून घ्यावा लागत होता. यासोबत आता टॅब स्विच करण्यासाठी Alt+Tab हा किबोर्ड शॉर्टकट आहे. वेबसाइट टास्कबारवर पिन करण्याचाही पर्याय आता आला आहे.
हे अपडेट मिळवण्यासाठी तुम्हाला Settings > Update & Security > Windows Update आणि इथे Check for updates वर क्लिक करावं लागेल.
हे अपडेट हळूहळू सर्वांना उपलब्ध करून देण्यात येत असून तुम्हाला स्वतःला डाउनलोड करून इंस्टॉल करायच असेल तर आमचा हा व्हिडिओ पाहू शकता.