गूगलने आज त्यांच्या प्ले स्टोअरवरून पेटीएमच्या पेमेंट ॲपला काढून टाकलं आहे. गूगलच्या म्हणण्यानुसार पेटीएमने प्ले स्टोअरच्या जुगार/Gambling संबंधी नियमांचं वारंवार उल्लंघन केलं आहे. हे ॲप प्ले स्टोअरवरून काढून टाकलं असलं तरी ज्यांच्याकडे हे ॲप आधीपासून आहे त्यांना काळजी करण्याची गरज नाही. त्यांच्याकडे पेटीएम नेहमी प्रमाणे सुरू राहील. फक्त नव्याने कोणाला पेटीएम घ्यायचं असेल तर ते त्यांना डाउनलोड करता येणार नाही. पेटीएमने ट्विट करून याबाबत माहिती देत आमचं ॲप लवकरच प्ले स्टोअरवर परतणार असल्याचं सांगितलं आहे.
यासंबंधीत एक ब्लॉग लिहून माहिती देण्यात आली असून यामध्ये एखाद्या ॲपमध्ये ऑनलाइन कसिनो किंवा जुगार/बेटिंग सुरू करणं अवैध आहे. यूजर्सचं नुकसान होऊ नये या उद्देशाने गूगलने हे नियम लागू केले आहेत. यामुळे यूजर्सची संभाव्य फसवणूक टाळता येईल असं गूगलला वाटतं. शिवाय एखाद्या ॲपमधून अमुक एका वेबसाइट/ॲपकडे redirect करून तिथे असे प्रकार घडणार असतील तर ते सुद्धा अवैध असेल असंही गूगलने स्पष्ट केलं आहे. जर वारंवार हा प्रकार घडला तर आधी हे ॲप काढून टाकण्यात येईल आणि पुन्हा असा प्रकार झाला तर डेव्हलपर अकाऊंट बंद करण्यात येईल.
याच नियमांमुळे Dream11, MPL सारख्या सेवांची ॲप्स प्ले स्टोअरवर उपलब्ध नाहीत. पेटीएमने Paytm First Games नावाची सेवा आणली आहे ज्यामध्ये अशाच गेमचं गोंडस नाव दिलेल्या जुगाराच्या गोष्टी चालतील. पेटीएमला याबाबत माहिती नव्हती की त्यांनी माहिती असून त्याकडे दुर्लक्ष केलं त्यांनाच ठाऊक. पण भारतातल्या ॲप्स आणि त्यांच्यामध्ये सुरू असलेल्या बऱ्याच त्रासदायक गोष्टींना आळा घालणं नक्कीच गरजेचं आहे. पाश्चात्य देशांप्रमाणे इथे अशा गोष्टींबद्दल कंपन्याना कुठेही जाब विचारला जात नाही त्यामुळे वाट्टेल तितक्या जाहिराती टाका, फसव्या जाहिराती टाका असे प्रकार सुरू आहेत. किमान गूगलने तरी अँड्रॉइड यूजर्सचा विचार करून अशा ॲप्सवर लक्ष ठेवायला हवं.
ज्यांचे Paytm Wallet/Payments Bank मध्ये पैसे आहेत त्यांनी घाबरू नये. तुम्ही अजूनही ॲप वापरू शकता आणि हे ॲप काही दिवसातच प्ले स्टोअर नक्की परत येईल.
अपडेट 07:08 PM : पेटीएम पुन्हा प्ले स्टोरवर उपलब्ध झालेलं आहे.
गूगलची ब्लॉग पोस्ट : Understanding our Play gambling policies in India