काही दिवसांपूर्वीच रिलायन्स जिओने त्यांच्या सर्व फायबर ब्रॉडब्रॅंडचा मर्यादित डेटा बंद करून अनलिमिटेड डेटा देण्याचं जाहीर केल्यावर लगेच एयरटेलनेसुद्धा सर्व प्लॅन्सवर अमर्याद डेटा देणार असल्याचं जाहीर केलं आहे. शिवाय 499 रुपयांचा नवा प्लॅन आणण्यात आला असून यामध्ये 40Mbps स्पीड मिळेल.
एयरटेलच्या ब्रॉडबॅंड सेवेचं नाव Xstream Fiber असं असून ही सेवा जिओ फायबरच्या आधीपासून सुरू आहे मात्र अजूनही जिओपेक्षा बऱ्याच कमी ठिकाणी उपलब्ध आहे. आजपर्यंत एयरटेल ग्राहकांना त्यांच्या प्लॅन्समध्ये अनलिमिटेड डेटा हवा असेल तर अधिकचे २९९ रुपये मोजावे लागत होते मात्र आता आहे त्या प्लॅन्सच्या किंमतीतच अमर्याद डेटा मिळेल. सोबत Airtel Xstream द्वारे १००००+ चित्रपट, मालिका, 7 OTT अॅप्सची सेवा मिळेल. सर्व प्लॅन्समध्ये Airtel Xstream 4K TV Box मिळेल! यासाठी १५०० डिपॉजिट मात्र भरावं लागेल जे तुम्ही सेवा बंद केली तर परत मिळेल. ९९९, १४९९ आणि ३९९९ च्या प्लॅन्सवर Disney+ Hotstar, Amazon Prime Video व ZEE5 सुद्धा मिळतील!
ब्रॉडब्रॅंड क्षेत्रात आता तीव्र स्पर्धा सुरू होणार हे स्पष्ट आहे. अजूनही बरेच महीने अनेक कर्मचारी घरूनच काम करणार असं चित्र असल्याने याचा फायदा ग्राहक आणि कंपन्या दोघांनाही होऊ शकतो.
काही दिवसांपूर्वी जिओने truly unlimited डेटा देणार असं म्हटलं होतं पण प्रत्यक्षात या सर्व प्लॅन्सवर (500 Mbps plan or 1 Gbps प्लॅन सोडून) 3.3TB डेटाची मर्यादा आहे. वास्तविक पाहता इतका वापर होणं जवळपास अशक्य आहे मात्र तरीही असं truly unlimited मार्केटिंग करून डेटा कॅप लावणं नक्कीच एकप्रकारे फसवणूक आहे. एयरटेलला सुद्धा अशीच मर्यादा आहे याची नोंद घ्यावी.