Android 11 प्रीव्यू सादर : अँड्रॉइडची नवी आवृत्ती चाचणीसाठी उपलब्ध!

Android 11

गूगलने आज अमेरिकेत वर्णद्वेषावरून सध्या सुरु असलेले वाद लक्षात घेत यंदाचा अँड्रॉइडसाठी असलेला कार्यक्रम रद्द करून नव्या आवृत्तीची माहिती थेट ऑनलाईन जाहीर करून टाकली आहे. गूगलने त्यांच्या लोकप्रिय स्मार्टफोन ऑपरेटिंग सिस्टिम अँड्रॉइडच्या पुढील आवृत्तीबद्दल माहिती जाहीर करत याचा प्रीव्यूसुद्धा उपलब्ध करून दिला आहे. Android 11 ही पुढील आवृत्ती असून पीपल, कंट्रोल्स, प्रायव्हसी आणि डेव्हलपर फ्रेंडली सुविधा देणारी असेल असं सांगण्यात आलं आहे.

गूगलने आजवर त्यांच्या लोकप्रिय मोबाइल ऑपरेटिंग सिस्टिमच्या विविध आवृत्त्यांची नावे डेझर्ट्सवरून ठेवली होती. उदा. कपकेक, डोनट, फ्रोयो(2.0), जिंजरब्रेड(2.3), हनीकोंब (3.0), आईसक्रीम सँडविच(4.0), जेली बीन(4.1), किटकॅट(4.4), लॉलीपॉप(5.0), मार्शमेलो(6.0), नुगट(7.0), ओरीओ(8.0), पाय(9.0) नंतर Android 10 आणि आता येणाऱ्या नव्या आवृत्तीचं अधिकृत नाव Android 11 असं असणार आहे. याबद्दल आज गूगलतर्फे अधिकृत माहिती देण्यात आली आहे.

या प्रीव्यू आवृत्त्या ह्या डेव्हलपरद्वारे करण्यात येणाऱ्या चाचण्यांसाठीच असतात. सामान्य यूजर्सनाही या इंस्टॉल करता येत असल्या तरी शक्यतो त्या फंदात पडू नये कारण यामुळे तुमच्या फोनमधील डेटा जाऊ शकतो किंवा फोन बिघडू सुद्धा शकतो. आपल्यासाठी फक्त येणाऱ्या अँड्रॉइडमध्ये काय सुविधा असू शकतील याचा अंदाज येईल यादृष्टीने माहिती मिळते.

Google Pixel 2, Google Pixel 2 XL, Google Pixel 3, Google Pixel 3 XL, Google Pixel 3a, Google Pixel 3a XL, Google Pixel 4, Google Pixel 4 XL या फोन्ससाठी सध्या अँड्रॉइड ११ डाउनलोड्स उपलब्ध आहेत. लवकरच OnePlus, Nokia, Xiaomi, Realme, LG व Vivo यांच्या फोन्ससाठीही उपलब्ध होतील.

Exit mobile version