सध्या कोरोना/COVID-19 मुळे जगभर बऱ्याच ठिकाणी लॉकडाऊन करण्यात आलेलं आहे. अशावेळी शाळा, कॉलेज सारखी ठिकाणे तर आधी बंद करण्यात आली. घरबसल्या फावल्या वेळात काही तरी करावं या उद्देशाने काही विद्यार्थ्यांच्या सुपीक डोक्यात भन्नाट कल्पना आली आणि त्यांनी चक्क माइनक्राफ्ट (Minecraft) या गेममध्ये त्यांच्या शाळा/कॉलेजची प्रतिकृती बनवायला सुरुवात केली. अनेकांनी तर पूर्ण कॉलेजच्या कॉलेज या गेममध्ये उभं केलं आहे!
यूनिवर्सिटी ऑफ पेनसिल्व्हेनिया, नॉर्थ वेस्टर्न यूनिवर्सिटी आणि बॉस्टन यूनिवर्सिटीच्या विद्यार्थ्यानी आधी याची सुरुवात केली अशी माहिती आहे. यामध्ये त्यांनी वर्ग, विद्यार्थ्यांच्या खोल्या, फूड ट्रकपर्यंत सर्वकाही बनवलं आहे! काही जण तर यामध्ये पदवीदान समारंभाचीही तयारी करत असल्याचं ऐकिवात आहे!
माइनक्राफ्ट या प्रसिद्ध गेमला जवळपास अकरा वर्षे पूर्ण होत असून सध्या ११.२ कोटी लोक दरमहा ही गेम खेळत आहेत! मायक्रोसॉफ्टने २०१४ मध्ये माइनक्राफ्टची डेव्हलपमेंट पाहणार्या मोजांग कंपनीचं तब्बल 2.5 बिलियन डॉलर्स खर्चून अधिग्रहण केलं होतं! माइनक्राफ्ट अजूनही सर्वाधिक कॉपी विकलेल्या पीसी गेम्समध्ये आघाडीवर आहे. माइनक्राफ्ट हे नेहमीच्या गेम्सप्रमाणे नसून अनेक गोष्टी शिकण्यासाठीही याचा उपयोग केला जातो. ब्लॉक्स वापरुन आपल्या कल्पना शक्तीला वाव देत ही गेम हव्या त्या प्रकारे खेळता येते! यामुळे मेंदूला चालना मिळत असल्याचंही अनेक संशोधनांमध्ये सांगण्यात आलं असून विद्यार्थ्यांना कोडिंग शिकवण्यासाठीही या गेमचा वापर करण्यात येत आहे. ही गेम पीसी, प्लेस्टेशन, एक्सबॉक्स, अँड्रॉइड, iOS वर उपलब्ध आहे!
कल्पनाशक्तीला वाव देत हवी ती गोष्ट यामध्ये तयार करता येते. काही जणांनी पूर्ण शहरं, कॅल्कुलेटर, गेममध्ये गेम्स बनवली आहेत! एकाने तर या गेममध्ये वापरता येईल असा कम्प्युटर सुद्धा बनवला आहे!
गेल्या काही आठवड्यात गेमिंगचं प्रमाण प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढलं असून अशावेळी माइनक्राफ्ट तरी कसे मागे राहील… आधीच खूप क्रिएटिव लोक असणाऱ्या या गेमच्या जगतात आता माइनक्राफ्ट सर्व्हर्स मोठ्या सर्च केले जात आहेत. विद्यार्थी त्यांनी तयार केलेल्या गोष्टी फेसबुक, रेडिट व डिस्कॉर्डवर शेयर करताना पाहायला मिळत आहेत. भारतात ही गेम खेळण्याचं प्रमाण फारच कमी असावं. पब्जीसारख्या गेम्सचं वेड लागलेल्या लहान मुलांना अशा गेम्सद्वारे काही क्रिएटिव करता येऊ शकतं.