नेटमार्केटशेयरने जाहीर केलेल्या माहितीनुसार मोझिलाच्या फायरफॉक्सला मागे टाकत मायक्रोसॉफ्टचा एज ब्राऊजर आता यूजर्सच्या संख्येत दुसऱ्या स्थानी आला आहे! पहिल्या स्थानी गूगलचा क्रोम ब्राऊजर कायम आहे. या संस्थेने ऑपरेटिंग सिस्टम आणि ब्राऊजर्सविषयीची मार्च २०२० साठीची माहिती नुकतीच जाहीर केली आहे.
वेब ब्राऊजर्समध्ये गूगल क्रोमने आपलं स्थान कायम ठेवलं असून त्यामध्ये लवकर काही बदल होईल अशी चिन्हं नाहीत. ६८.५ हिस्सा क्रोमकडे आहे! मायक्रोसॉफ्टने अलीकडेच क्रोमियमची जोड दिलेला एज ब्राऊजर सादर केला होता. यामुळे काही अंशी एजचा वापर वाढला आहे आणि त्यांनी आता चक्क फायरफॉक्सला मागे टाकलं आहे. एजचा हिस्सा आता ७.५९ टक्के असून फायरफॉक्सचा ७.१९ तर इंटरनेट एक्सप्लोररचा ५.८७ इतका आहे!
New Microsoft Edge Browser Download Link : https://www.microsoft.com/en-us/edge
सध्या बाजारात उपलब्ध ब्राऊजर्सपैकी फक्त फायरफॉक्स हा एकमेव ब्राऊजर असा आहे जजो क्रोमियम इंजिन वापरत नाही. क्रोमियमची एकाधिकारशाही होऊ नये म्हणून फायरफॉक्सने तग धरणं आपणा सर्वांसाठी गरजेचंच आहे. आता ओपेरा व सफारीचीसुद्धा फायरफॉक्सला स्पर्धा करावी लागत आहे.
डेस्कटॉप ऑपरेटिंग सिस्टममध्ये विंडोज १० आता ५७.३४ टक्के हिस्सा व्यापून आहे तर त्यानंतर विंडोज ७ २६.२३ टक्के, विंडोज ८.१ चा ३.६९ टक्के आणि macOS X चा २.६२ टक्के हिस्सा आहे!
आश्चर्याची गोष्ट म्हणे या महिन्यात चक्क विंडोज ७ चा वापर वाढलेला दिसून आला आहे! २५.२२ टक्क्यांवरून आता २६.२३ टक्क्यांवर पोहोचला आहे! हे घडण्याचं कारण लोक सध्या करोना/COVID-19 मुळे वर्क फ्रॉम होम साठी त्यांच्या जुन्या लॅपटॉप/कम्प्युटरचा वापर करू लागले आहेत असं सांगण्यात आलं आहे.