जिओसोबतच्या गेल्या कित्येक महिन्यांदरम्यान सुरू असलेल्या स्पर्धेत एयरटेल मागे पडत असताना ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याची जाहीर झालेली माहिती त्यांच्यासाठी नक्कीच सुखावणारी असेल. या दोन महिन्यापैकी ऑक्टोबरमध्ये ५० लाख आणि नोव्हेंबरमध्ये ७० लाख ग्राहक जोडण्यात एयरटेल यशस्वी झाली आहे. 4G नेटवर्क मध्ये मोठी सुधारणा करून इतर नेटवर्क्सच्या मानाने अधिक इंटरनेट स्पीड यासाठी प्रमुख कारण असू शकेल असं सांगितलं जात आहे. साधारणतः एयरटेलमध्ये १५ लाख ग्राहक जोडले जात असायचे मात्र या दोन महिन्यात मोठ्या प्रमाणात ग्राहक एयरटेलकडे वळत असल्याचं दिसून येत आहे.
TRAI या सरकारी संस्थेला दिलेल्या माहितीनुसार एयरटेलने ही कामगिरी केली आहे. या दरम्यान गेले अनेक महीने सलग ग्राहक जोडण्यात यशस्वी झालेली जिओ मात्र अलीकडे ग्राहक गमावताना दिसत आहे! याचं मुख्य कारण म्हणजे IUC अर्थात दुसऱ्या ऑपरेटरला लावलेल्या कॉल्सवर लावण्यात येणारा चार्ज कारणीभूत आहे. अनेक ग्राहक याबाबत नाराज असून एयरटेल व्होडाफोन-आयडियाने सुद्धा हा चार्ज सुरू केला होता मात्र एक दिवसातच यांनी तो रद्द केला आहे. जिओने मात्र तो अजूनही सुरूच ठेवला असून हा चार्ज देण्यास ग्राहकांचा स्पष्ट नकार दिसत आहे.
व्होडाफोन-आयडियाच्या भवितव्याबाबत आता तितकी शाश्वती नसल्याने आणि या दोन्ही कंपन्या एकत्र आल्यापासून सुरू झालेल्या विविध समस्या थांबायचं नाव घेत नसल्यामुळे यांचे ग्राहक पोर्ट करत आहेत. जिओ IUC चार्ज घेत असल्यामुळे ते नको आणि BSNL चं 4G अद्याप उपलब्ध नाहीच. यामुळे ग्राहकांना सध्यातरी एयरटेल हाच उत्तम पर्याय दिसत आहे. शिवाय नेटवर्कमध्ये केलेला सुधार जागोजागी पाहण्यात येत आहे. काही ठिकाणी एयरटेलचा इंटरनेट स्पीड 50-60Mbps वेग गाठत असल्याचं निदर्शनास आलं आहे!
कॉलिंग व डेटासाठीही प्लॅन्स भले जिओपेक्षा फार स्वस्त नसले तरी जवळपास तेव्हढयाच दरात अमर्यादित कॉलिंग सोबत डेटा मिळत आहे. शिवाय सेवेबाबत झालेले बदल सुद्धा ग्राहकांच्या पसंतीस उतरत आहेत. Xstream, Wynk सारख्या अॅप्सद्वारे ग्राहकांना उत्तम कंटेंटसुद्धा उपलब्ध करून दिलेला आहे.
हा लेख एयरटेलच्या बाबतीत चांगलं मत प्रदर्शित करणारा भासत असला तर वास्तविक स्थिती सांगणारा आहे याची नोंद घ्यावी. जिओचे ग्राहक वाढल्यानंतर कमी होत गेलेला इंटरनेट स्पीड आपण सर्वानी अनुभवलाच असेल. व्होडाफोन-आयडिया या दोन्ही कंपन्या एकत्र येण्याआधी चांगली सेवा द्यायच्या असंही मत पाहायला मिळत आहे. स्पीडचा विषय अर्थात तुम्ही सेवा वापरत असलेल्या ठिकाणावर अवलंबून आहे. शेवटी टेलिकॉम कंपन्याची स्पर्धा ग्राहकांच्याच फायद्याच्या ठरणार आहेत. मात्र एकच कंपनी सलग अनेक महीने यशस्वी होत असल्यास ते एकूण व्यवस्थेसाठी चांगलं चिन्ह नसतं. त्यामुळं अशा प्रकारे जिओसोडून इतर टेलिकॉम कंपन्यासुद्धा टक्कर देत असल्याच पाहिजेत. अन्यथा स्पर्धा संपून परत ग्राहकांना सर्वात पुढे असलेल्या कंपनीच्या मनमानीचा त्रास सहन करावा लागू शकतो.