स्नॅप या स्नॅपचॅट अॅपची मालकी असणाऱ्या कंपनीने त्यांच्या स्मार्ट गॉगल्स स्पेक्टॅकल्स ३ (Spectacles 3) सादर केले आहेत. या ऑग्मेंटेड रिअॅलिटी आधारित गॉगल्सची नवी आवृत्ती आता नव्या डिझाईनसोबत पहायला मिळेल. 3D इफेक्टसाठी आता आणखी एक कॅमेरा जोडण्यात आला आहे. हे गॉगल्स नोव्हेंबर महिन्यात spectacles.com वर $380 (₹२७०००) मध्ये उपलब्ध होतील.
आधीच्या मॉडेलपेक्षा याची किंमत दुपटीने वाढली आहे. फॅशनवर लक्ष केंद्रित असणाऱ्या आधीपेक्षा लहान ग्रुपकडे पाहून हे गॉगल आणल्याच स्नॅपने सांगितलं आहे. आधीच्या मॉडेलला अति प्रतिसाद अपेक्षित करून निर्मिती केल्यामुळे स्नॅपला बरंच नुकसान सहन करावं लागलं होतं.
नव्या मॉडेलमध्ये 3D इफेक्टसचा वापर करत ऑग्मेंटेड रिअॅलिटी (AR) वापरता येणार आहे. यासाठीच नवा कॅमेरा जोडण्यात आलेला आहे. या स्नॅप स्पेक्टॅकल्सद्वारे तुम्ही फोटो व व्हिडिओ काढू शकता. यासाठी केवळ गॉगलवर असणारं बटन दाबावं लागतं. हे रेकॉर्ड केलेले व्हिडिओ लगेच फोनवर ट्रान्सफर करता येतात किंवा यूट्यूबवर अपलोड करता येतात. मात्र अनेकांना हे ट्रान्सफर करून मग अपलोड करण्याची प्रक्रिया आवडत नाही. तूर्तास या आवृत्तीमध्ये तरी त्याबाबत काही बदल झालेला नाही.
एका चार्जवर हा गॉगल ७० व्हिडिओ आणि २०० फोटो काढू शकतो. यामधील 4GB चं स्टोरेज १०० व्हिडिओ किंवा १२०० फोटो साठवू शकेल. हे गॉगल त्याच्या कव्हर केसमध्ये ठेवताच चार्ज होतात! पूर्ण चार्ज होण्यास ७५ मिनिटे लागतील. फोटो 1642 by 1642 pixels तर व्हिडिओ 1216 by 1216 या रेजोल्यूशनमध्ये रेकॉर्ड होतात.
दरम्यान स्नॅप कंपनीच्या स्नॅपचॅटला आता भारतातही मोठा प्रतिसाद मिळत असून दररोज या अॅपचा वापर करणाऱ्या भारतीयांच्या संख्येत तब्बल ४०% वाढ पाहायला मिळाली आहे अशी माहिती कंपनीतर्फे देण्यात आली आहे! या प्रतिसादामुळे कंपनीने आता भारतात पहिलं ऑफिस सुरू करण्याचा निर्णय घेतला असून मुंबईमध्ये त्यांचं अधिकृत कार्यालय असेल. स्नॅपचॅट हे अॅप तरुणाईमध्ये खास लोकप्रिय असून यामध्ये २४ तासानंतर गायब होणारे फोटो व व्हिडिओ शेयर करता येतात. आता आपण इंस्टाग्रामवर पाहत असलेल्या स्टोरी आधी स्नॅपचॅटवर सुरू झाली होत्या!
कंपनीने स्नॅपचॅट चार भारतीय भाषांमध्ये उपलब्ध करून दिलं असून यामध्ये मराठीसोबत गुजराती, पंजाबी आणि हिंदीचा समावेश आहे! यामध्ये आता आणखी पाच भाषा जोडल्या जाणार आहेत. स्नॅपने याआधी पेप्सी, वनप्लस, कॅडबरी यांच्यासोबत भारतात भागीदारी केली आहे. JioSaavn आणि gaana साठी त्यांनी स्नॅपकिट सुद्धा उपलब्ध केलं होतं.