अमेरिकेने घातलेल्या ट्रेड बॅन नंतर चीनी कंपनी हुवावेला (Huawei) मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागत असून अँड्रॉइड सोबत इतर अनेक अमेरिकन उत्पादनांनी त्यांचा सपोर्ट काढून घेतला होता. त्यामुळे त्यांनी आता स्वतःची ऑपरेटिंग सिस्टम डेव्हलप केली असून त्याबद्दल अधिकृत माहिती काल जाहीर करण्यात आली आहे. नव्या ऑपरेटिंग सिस्टमचं नाव हार्मनी ओएस (HarmonyOS) असं असणार आहे. हुवावे डेव्हलपर कॉन्फरन्समध्ये फोनवरील ओएस डेमो देण्यात आला नाही मात्र आज त्यांच्या नव्या Honor Vision TV वर ही ऑपरेटिंग सिस्टम पाहायला मिळेल!
हार्मनी ओएस फोन, टॅब्लेट, वियरेबल्स (स्मार्टवॉच), टीव्ही, कार्स अशा सर्व ठिकाणी वापरता येणार असून अँड्रॉइड प्रमाणेच ही सुद्धा ओपन सोर्स असेल. हुवावेने दावा केला आहे की त्यांची ओएस मायक्रोकर्नल आधारित असेल ज्यामुळे ही अँड्रॉइडपेक्षा अधिक सुरक्षित असेल. त्यामध्ये वापरलेल्या कोडिंग सिस्टममुळे या ओएसची कामगिरीसुद्धा अँड्रॉइड पेक्षा चांगली असेल असं सांगितलं आहे. या ओएसमध्ये AI चा समावेश केलेला असेल.
दिलेल्या माहितीनुसार या नव्या हार्मनी ओएसवर अँड्रॉइड अॅप्स चालणार नाही. सध्यातरी थेट इंस्टॉल करून वापरण्याची सोय दिलेली नाही असं हुवावेच्या अधिकाऱ्यानी सांगितल आहे. मात्र डेव्हलपर त्यांच्या अँड्रॉइड अॅपमध्ये अगदी थोडासा बदल करून हार्मनी ओएससाठी अॅप्स तयार करू शकतात.
सध्यातरी हुवावेचे फोन्स अँड्रॉइड आधारित ऑपरेटिंग सिस्टमचाच वापर करणार असून येणाऱ्या काळात त्यांच्या फोन्सवर हार्मनी वापरलेली दिसेल. मात्र सध्या प्रचंड प्रमाणात वापर होत असलेल्या अँड्रॉइडसारख्या ऑपरेटिंग सिस्टमला आव्हान देणं ते सुद्धा एका चीनी कंपनीने आणि ते त्यात यशस्वी होण्याची शक्यता ही नक्कीच विचार करण्यासारखी गोष्ट आहे. सध्या फोन विक्रीमध्ये हुवावे जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे. अॅपलला त्यांनी काही महिन्यापूर्वीच मागे टाकलं होतं. मात्र आता अँड्रॉइड वापरता येणार नसल्याची अडचण निर्माण झाल्यावर त्यांना स्वतःची ओएस आणावी लागली आहे. यानंतर त्यांना स्मार्टफोन बाजारात किती यश मिळेल ते पाहणं औत्सुक्याच ठरेल..!