मायक्रोमॅक्स भारतात आता हुवावेचेही फोन्स विकणार!

चीनी स्मार्टफोन कंपनी हुवावे (Huawei)ने भारतीय कंपनी मायक्रोमॅक्ससोबत भागीदारी केली असून याद्वारे ते त्यांची ऑफलाइन विक्री वाढवण्यावर लक्ष देणार आहेत. आम्ही मायक्रोमॅक्ससोबत भागीदारीमध्ये हुवावेचे फोन्स त्यांच्या ऑफलाइन मल्टीब्रॅंड आउटलेटमध्ये उपलब्ध करून देत आहोत असं हुवावेचे उपप्रमुख ऋषि गुप्ता यांनी सांगितलं आहे. हुवावेचा हॉनर हा ब्रॅंड या भागीदारीमध्ये समाविष्ट नसेल.

मायक्रोमॅक्सच्या ब्रॅंड दुकानांमध्ये मायक्रोमॅक्सचे फोन्ससुद्धा उपलब्ध असतीलच. मात्र हुवावे आता आधीच उपलब्ध असलेल्या त्यांच्या या नेटवर्कचा वापर करणार आहे अशी माहिती दीप्ती मेहरा (मार्केटिंग प्रमुख, मायक्रोमॅक्स) यांनी दिली आहे. या भागीदारीमध्ये को ब्रॅंडिंग केलं जाणार नसून मायक्रोमॅक्स स्वतःचे फोन्स सादर करून उपलब्ध करून देत राहणार आहेच.

हुवावे ही स्मार्टफोन विक्रीत जगातली दुसऱ्या क्रमांकाची कंपनी आहे. यांनी २०१८ मध्ये भारतात अधिकृत प्रवेश केला होता. दरम्यान ते हॉनर या सबब्रॅंड अंतर्गत वेगळ्या मालिकेतील फोन्स भारतात विकत आहेत. सुरुवातीला क्रोमासोबत भागीदारी करून ऑफलाइन विक्री सुरू करण्यात आली नंतर पूर्विका मोबाइल्स व आता मायक्रोमॅक्स.

हुवावेने २०१८ मध्ये तब्बल २० कोटी फोन्स विकले होते. या वर्षी मे अखेरपर्यंतच दहा कोटी फोन्सची विक्री त्यांनी केली आहे. यापुढे मात्र काही दिवसांपूर्वी अमेरिकेतील नियमांमुळे गूगल व इतर कंपन्यानी हुवावेसोबत सर्व देवाणघेवाण थांबवली असून त्यामुळे हुवावेला यापुढे अँड्रॉइडचा वापर न करता त्यांचे फोन्स विकावे लागतील ज्याचा त्यांच्या विक्रीवर नक्कीच मोठा परिणाम होईल. यामधून मार्ग काढण्याचे प्रयत्न सध्या सुरू आहेत.

२०१४ च्या दरम्यान भारतात सर्वात आघाडीला पोहचून बाजारातील २०% हिस्सा मिळवणारी मायक्रोमॅक्स आता अवघ्या २% वर येऊन पोहोचली आहे. नोटबंदीनंतर त्यांनी बाजारातून माघार घेतली ते तेथून त्यांना परतणं शक्य झालं नाही. चीनी फोन कंपन्यासमोर जवळपास कोणत्याच भारतीय कंपनीचा टिकाव लागलेला नाही. आता मायक्रोमॅक्स प्रमुख राहुल शर्मा यांनी वेगळे पर्याय शोधत इलेक्ट्रिक दुचाकी बनवण्याचा निर्णय घेतला असून Revolt Intellicorp या नव्या कंपनीद्वारे या गाड्यांची निर्मिती केली जाणार आहे. दरम्यान त्यांनी भारतातली पहिली AI आधारित बाइक RV400 सादर केली आहे. आता लवकरच भारतात इलेक्ट्रिक गाड्यांची संख्या वाढीस लागणार असून त्यावर लक्ष ठेऊन हा निर्णय घेतलेला दिसत आहे.

Exit mobile version