फेसबुकने आज त्यांच्या स्वतःच्या क्रिप्टोकरन्सीबद्दल माहिती जाहीर केली असून या क्रिप्टोकरन्सीचं नाव लिब्रा असं असणार आहे. याद्वारे नाममात्र शुल्क देऊन आपण आर्थिक व्यवहार करू शकू. हे व्यवहार ऑनलाइन व ऑफलाइन अशा दोन्ही पद्धतीने करता येतील. लिब्राद्वारे ऑनलाइन व्यवहारांसाठी कॅलिब्रा (Calibra) हे वॉलेट सुद्धा फेसबुकतर्फे तयार करण्यात आलं आहे. या वॉलेटचा फेसबुक, मेसेंजर, व्हॉट्सअॅप या सर्वांमध्ये करण्यात येईल असंही यावेळी सांगण्यात आलं आहे! २०२० च्या पहिल्या सहामाहीत फेसबुक लिब्रा सर्वांसाठी उपलब्ध केली जाईल.
क्रिप्टोकरन्सी हे एक डिजिटल आभासी चलन असून यामध्ये व्यवहारांच्या सुरक्षिततेसाठी, चलनाच्या नियंत्रणासाठी व पैसे ट्रान्सफर योग्यता तपासून पाहण्यासाठी क्रिप्टोग्राफीचा वापर केलेला असतो. याचं विकेंद्रीकरण केलेलं असल्याने यावर कोणा एकाच नियंत्रण नसतं!
मध्यंतरी बिटकॉइन या क्रिप्टोकरन्सीने आलेल्या वादळामुळे अनेकांना क्रिप्टोकरन्सीबद्दल ओळख निर्माण झाली. बिटकॉइन जगातली सर्वात पहिली ओपन सोर्स क्रिप्टोकरन्सी. याची सुरुवात कोणी केली तेसुद्धा अजूनही कोणाला नीट ठाऊक नाहीय. या वादळात अनेकांनी नेमकं ही करन्सी/चलन कशा प्रकारे काम करतं हे जाणून न घेताच पैसे ओतण्यास सुरुवात केली. अनेकांनी यात पैसे कमावले आणि गमावलेसुद्धा… त्यानंतर क्रिप्टोकरन्सी कशी अस्थिर आहे यातून गैरप्रकार होऊ शकतात वगैरे ओरड सुरू झाली. त्या प्रकरणात भारतीय सरकारने क्रिप्टो व्यवहारांवर बंदी घातलेली आहे. जी अद्याप सुरू असून पुढे काहीही निर्णय झालेला नाही.
लिब्रा कशा प्रकारे काम करेल ?
आधी तुमचं स्थानिक चलन (डॉलर्स/रुपये) घेऊन त्याचे लिब्रा चलन खरेदी करा, आता ते लिब्रा चलन तुमच्या व्यवहारांसाठी वापरा. या व्यवहारांसाठी मोठी फी वगैरे आकारली जाणार नाही किंवा या व्यवहारासोबत तुमचं नावसुद्धा जोडलं जाणार नाही. शिल्लक लिब्रा चलन पुन्हा तुमच्या स्थानिक चलनामध्ये (डॉलर्स/रुपये) रूपांतरित करूनही मिळेल!
लिब्रा क्रिप्टोकरन्सी बद्दल अधिकृत माहिती : https://libra.org/
फेसबुक लिब्राचं पुर्णपणे नियंत्रण करणार नसून त्यांना इतर संस्थापक सदस्य कंपन्यांप्रमाणे केवळ एक मत म्हणून ग्राह्य धरण्यात येईल. लिब्रा असोसिएशनमध्ये Visa, Uber, Andreessen Horowitz यांचा समावेश असून यांनी प्रत्येकी किमान 10 Million डॉलर्स यामध्ये गुंतवले आहेत असं सांगण्यात येत आहे. हे लिब्रा असोसिएशन लिब्रा ब्लॉकचेन या ओपन सोर्स डेव्हलपर प्लॅटफॉर्मची प्रसिद्धी करेल. यासाठी स्वतंत्र प्रोग्रामिंग लॅंग्वेज करणं आणि व्यावसायिकांना लिब्राचा वापर करण्यासाठी सुरुवात करून देऊन ग्राहकांना विविध ऑफर्सद्वारे सूट देणं अशी कामे करेल.
फेसबुक आणखी एक उपकंपनी तयार करत असून या कंपनीचंही नाव Calibra असं असणार आहे. ही कंपनी Crypto व्यवहार पाहणे व यूजर्सची प्रायव्हसी सांभाळणे आणि त्यांच्या फेसबुक अकाऊंटसोबत लिब्राचं संबंध येऊ न देणे यासाठी काम करेल. जेणेकरून ती माहिती जाहिरातींसाठी वापरता येणार नाही. Calibra च्या सदस्यांना यूजर्सकडून व्यवहार केल्या जाणार्या किंवा ठेवल्या जाणार्या पैशांवर व्याज मात्र मिळणार आहे! अर्थात हे लिब्रा चलन स्थिर राहण्यासाठी करण्यात येईल असं त्यांचं म्हणणं आहे! तूर्तास याबद्दल एक व्हाइटपेपर प्रसिद्ध करण्यात आला असून लिब्रा कशा प्रकारे काम करू शकेल याची प्राथमिक माहिती देण्यात आली आहे.