अॅपलच्या सुरुवातीच्या काळापासून अॅपलच्या iMac, आयपॉड, आयफोन सारख्या उत्पादनांची डिझाईन्स पाहणारे जॉनी आईव्ह (Jony Ive) लवकरच अॅपलमधून बाहेर पासून स्वतःची लव्हफ्रॉम नावाची डिझाईन फर्म सुरू करणार आहेत. या बातमीने तंत्रज्ञान विश्वात बरीच चर्चा घडताना दिसत आहे. गेली अनेक वर्षं अॅपलच्या चाहत्यांना त्यांच्या उपकरणांना त्यांच्या खास डिझाईन द्वारे आकार देणाऱ्या या मोठ्या माणसाने अॅपलसोबत ३० वर्षे राहिल्यानंतर आता निरोप घेण्याचा निर्णय घेतला आहे.
अॅपलमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला असला तरीही त्यांच्या नव्या कंपनीचा पहिला व प्रमुख ग्राहक अॅपलच असणार आहे. अनेकांना पडलेला प्रश्न होता की यापुढे अॅपलच्या डिझाईन्स कोण पाहणार, तर याचं उत्तर हेच असणार आहे की स्वतंत्र कंपनी/क्रिएटिव्ह एजन्सी (LoveFrom) स्थापन करून जॉनी आईव्ह हेच त्या कंपनीद्वारे अॅपलच्या उत्पादनांचं डिझाईन पाहतील.
जॉनी आईव्ह हे गेली कित्येक वर्षे अॅपलचे चीफ डिझाईनर म्हणून काम पाहत असून अॅपलच्या नव्या उत्पादनाचा व्हिडिओ सादरीकरण करत असताना त्यांचा नेहमीचा आवाज लोकांना नक्की आवडतोच! स्टीव्ह जॉब्सनंतर आधीच्या काळापासून अॅपलसोबत संबंध असलेल्या मोजक्या लोकांपैकी एक म्हणजे जॉनी आईव्ह. स्टीव्ह जॉब्सच्या पसंतीस उतरणारं डिझाईन त्यांच्या निधन झाल्यावरही बऱ्यापैकी पेलण्यात आईव्ह यशस्वी झाले म्हणण्यास हरकत नाही.
अॅपल इतक्यात लगेच नवीन चीड डिझाईनर नेमणार नसून त्यांच्या अॅलन डाय जे युजर इंटरफेस टीमचे प्रमुख आहेत ते अॅपलच्या चीफ ऑपरेटिंग ऑफिसर जेफ विलियम्स यांच्या सोबत हे काम पाहतील. बाकी अॅपल मधील या बदलामुळे सोशल मीडियावर मोठी चर्चा रंगली आणि जॉनी आईव्ह हा विषय गेले कित्येक तास जगभर ट्रेंडिंग आहे!