ES File Explorer प्ले स्टोअरवरून काढून टाकलं : पुन्हा एकदा गैरप्रकार !

गेल्या आठवड्यात बझफीड न्यूजच्या माहितीनुसार प्ले स्टोअरवरील विविध अॅप्स जाहिरातींच्या माध्यमातून गैरप्रकार करत असल्याबद्दल लेख प्रसिद्ध केला होता. प्ले स्टोअरवर वाढलेली फ्री चीनी अॅप्सची संख्या आणि त्याद्वारे नेहमी होणारे गैरप्रकार अलीकडे वारंवार उघडकीस येत आहेत. यापैकी सध्या DO Global ने डेव्हलप केलेल्या अॅप्स मध्ये असा प्रकार होत असल्याच समोर आल्यावर त्यांचे सर्व अॅप्स प्ले स्टोअरवरून काढून टाकण्यात आले आहेत.

ES File Explorer अनेक वर्षांपासून लोकप्रिय फाइल मॅनेजर अॅप आहे. सोप्या सुटसुटीत व अनेक सुविधांनी युक्त असूनही मोफत असल्यामुळे बर्‍याच जणांची पहिली पसंती असते. मात्र काही वर्षांपूर्वी हे अॅप डेव्हलपरने चीनी कंपनीला विकलं आणि याची अधोगती सुरू झाली. त्यांनी लगोलग त्या अॅपमध्ये सगळीकडे जाहिराती लावून टाकल्या. आता आता तर इतक वाढल की यूजरच्या परवानगीशिवाय अॅप्स डाऊनलोड करणे, अश्लील जाहिराती दाखवणे असे प्रकार ह्या अशा अॅप्सद्वारे केले जात आहेत. आता ही DO Global या प्रकारात सापडली म्हणून हे अॅप्स डिलिट होतील मात्र अजूनही बर्‍याच चीनी कंपन्या उघडपणे असे अॅड फ्रॉड करत आहेत! यावेळी गूगलने तब्बल ४६ अॅप्स एकाचवेळी काढून टाकले आहेत!

मध्यंतरी CM फाइल मॅनेजर, क्लिनमास्टरवर अशीच कारवाई करण्यात आली होती. क्लिनर, मेमरी बुस्टर, बॅटरी बुस्टर अशा नावांखाली हे अॅप्स युजर्सच्या फोन्समध्ये प्रवेश मिळवतात आणि नंतर परवानगी शिवाय बरेच गैरप्रकार करण्यास सुरुवात करतात. विचित्र बातम्या, अश्लील जाहिराती, न सांगता फाइल्स/अॅप्स डाऊनलोड करणे इ. काही उदाहरणे सांगता येतील. तूर्तास DO Global कंपनीने माफी मागितली आहे. आता माफी मागून कोड तात्पुरता बदलून पुन्हा प्ले स्टोअरवर प्रवेश मिळवायचा आणि परत पहिले पाढे पंचावन्न …!

खरेतर गूगलने याकडे लक्ष देणं अपेक्षित आहे. इतक्या मोठ्या प्रमाणावर वापर केले जात असणार्‍या अॅप्समध्ये उघड असे प्रकार चालत असताना फार चर्चा सुरू होई पर्यंत वाट पाहणे नक्कीच अँड्रॉइड यूजर्ससाठी चांगली बाब नाही. अॅपल यासाठी खास जागरूक असतं. आयफोन्सवरील प्रत्येक अॅप स्वतः तपासून मगच ते अॅप स्टोअरवर उपलब्ध करून दिलं जातं. गूगल निदान यापुढे तरी तशा प्रकारे काळजी घेईल ही अपेक्षा…

मराठीटेकचा याबाबत असा सल्ला आहे की अशा अॅप्स पासून दूर रहा आणि केवळ मोफत आहे म्हणून कुठलही अॅप लगोलग इंस्टॉल करू नका. फाइल एक्सप्लोररसाठी Solid ExplorerFiles GO हे उत्तम पर्याय आहेत.

Exit mobile version