मायक्रोसॉफ्टने त्यांच्या मिक्स्ड रिअॅलिटी हेडसेट होलोलेन्सची नवी आवृत्ती आज मोबाइल वर्ल्ड कॉंग्रेस (MWC) येथे सादर केली आहे! होलोलेन्स २ आता अधिक सुविधांसह औद्योगिक कारणांसाठी समोर ठेऊन बनवण्यात आलेला हेडसेट आहे ज्यामध्ये वास्तविक आणि आभासी अशा दोन्ही जगांचा मेळ साधलेला आहे. वास्तविक दृश्य आणि हेडसेटमधून होलोग्राम्सद्वारे दिसणारं आभासी जग नक्कीच खास अनुभव घ्यावं असं आहे. या Hololens चा व्हिडिओ नक्की पहा जेणेकरून हा किती गोष्टींमध्ये मदत करू शकतो आणि येणार्या काळात अशा प्रकारच्या गोष्टींमुळे जग कसं बदलेल याची कल्पना करता येईल!
अपडेट (०८/११/२०१९) : काही देशांमध्ये हा आता खरेदीसाठी उपलब्ध झाला आहे याची किंमत $3,500 (~₹२५००००) आहे!
आता या होलोलेन्सच वजन आधीच्या हेडसेटपेक्षा कमी असून वापरण्यास तिप्पट सोयीस्कर असल्याच सांगण्यात आलं! या नव्या हेडसेटमध्ये फील्ड ऑफ व्हयू सुद्धा दुपटीने वाढवण्यात आला आहे! हात व डोळे ट्रक करण्याची सोय सुद्धा देण्यात आली आहे. बिझनेस यूजर्सना हे भन्नाट होलोग्राम तंत्रज्ञान नक्कीच फार उपयोगी पडणार आहे. सत्या नाडेला (मायक्रोसॉफ्ट सीईओ) यांनी डिजिटल जग आणि वास्तविक जग यांच्या जोडण्यामध्ये कशा प्रकारे बदल घडून आणू शकतो याबद्दल माहिती दिली. आता मायक्रोसॉफ्ट यासाठीच अॅप स्टोअर ओपन करत असून लवकरच फायरफॉक्स ब्राउजरसुद्धा होलोलेन्सवर वापरता येईल! इतर डेव्हलपर या ओपन प्लॅटफॉर्मचा वापर करून स्वतःचे सॉफ्टवेअर/अॅप्स होलोललेन्ससाठी सहज तयार करू शकतील!
याची किंमत $3500 (~ ₹२,५०,०००)

या होलोलेन्समध्ये डिजिटल इमेजेस वापरुन होलोग्राम तयार केलेला असतो जो आपल्याला नेहमीच्या जागा सोबत ओव्हरलेद्वारे दिसतो. उदा. आपण एका खोलीत उभारले असू तर खोली स्कॅन करून खोलीमधील वस्तु आकार यांचा अंदाज घेऊन होलोग्राम्स दिसायला सुरुवात होते अर्थात हे फक्त ज्यांनी होलोलेन्स डोक्यावर घातलं आहे त्यांनाच दिसत असणार आहे मात्र नव्या होलोलेन्समुळे दोन होलोलेन्स यूजर्स एकाच वेळी सारखे होलोग्राम पाहू शकतात तेसुद्धा एका जागी नसताना… म्हणजे एक व्यक्ती पुण्यात व एक व्यक्ती सोलापूरमध्ये असेल तर सोलापूरमधील व्यक्ती प्रत्यक्षात पुण्यात उभी असल्याच होलोग्राम्सद्वारे दिसेल! आहे न कमाल…!
याच कार्यक्रमात Azure Kinect सुद्धा सादर करण्यात आलं. गेमिंगसाठी वापरलं जाणार तंत्रज्ञान आता डेव्हलपर्ससाठी विविध गोष्टींना वापरता यावं अशा प्रकारे डिझाईन करून स्वतंत्र रित्या उपलब्ध करून देण्यात आलं आहे. हे नवं अझुर कायनेक्ट $399 मध्ये मिळेल. यामध्ये मायक्रोफोन्स, डेप्थ सेन्सर, हाय डेफीनेशन कॅमेरा जोडलेला आहे!