होय. जगातला पहिला AI आधारित वृत्तनिवेदक तयार केल्यानंतर चीनच्या शिनव्हा (Xinhua) या वृत्त वाहिनीनेच आता याची नवी आवृत्ती एका महिलेच्या रूपात सादर करून पहिली कृत्रिम बुद्धेमत्तेवर आधारित वृत्तनिवेदिका बनवण्याचा मान मिळवला आहे! या वृत्तनिवेदिकेचं नाव शियोमेंग (Xiaomeng) असं देण्यात आलं आहे!
सध्याच्या वृत्तनिवेदकांना (न्यूज रिपोर्टर/अॅंकर्स) चिंतेत टाकणारी ही गोष्ट चीनच्या शिनव्हा न्यूज वाहिनीने करून दाखवली आहे! शिओमेंगला अगदी हुबेहूब मानवी रूप देण्यात आलं असून चेहर्याचे हावभाव, भुवयांची हालचाल असे सर्व अगदी खरोखर वाटावे इतके अचूक आहे!
खर्या जगतातील Xinhua न्यूजच्या अॅंकर Qu Meng यांच्यावर आधारित रूप, आवाज शिओमेंगला देण्यात आल्याच सांगण्यात येतं!
नोव्हेंबर २०१८ मध्ये याच चायना शिनव्हा न्यूजने जगातला पहिला AI न्यूज अॅंकर जगासमोर आणला होता! त्याचं नाव Qiu Hao असं होतं. यामध्ये काही सुधारणा करून अधिक अचूक हावभाव जोडून शिओमेंगची निर्मिती करण्यात आली आहे! Xinhua आणि Sogou Inc या यांनी एकत्र येत या कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित बातम्या सांगणार्या वृत्तनिवेदकाना अंतिम रूप दिलेलं आहे.
आता नव्या वाटत असलेल्या या AI (Artificial Intelligence) आधारित गोष्टी काही काळाने आपल्या आजूबाजूला सर्वत्र दिसू लागतील. आताच बर्याच कंपन्या नावाला का होईना जवळपास सर्वच नव्या उत्पादनाना AI ची जोड दिल्याचं सांगत आहेत! उदा. स्मार्टफोन्स, टीव्ही, बल्ब, फ्रीज, कॅमेरा, कार्स, इ. मराठीटेकचे AI बद्दल ट्विट्स या लिंकवर वाचू शकाल.
येणार्या काळात AI च्या अतिवापरामुळे अनेक प्रकारे धोका संभवतो असं अनेकांचं मत आहे. याबद्दल आपल्याला काय वाटतं याविषयी आम्हाला नक्की कळवा…