विंडोज १० आता जगातील सर्वात लोकप्रिय डेस्कटॉप ऑपरेटिंग सिस्टिम!

विंडोज १० आता तब्बल ७० कोटी डिव्हाईसेसवर सुरू आहे!

मायक्रोसॉफ्टने २०१८ इतरांच्या मानाने बर्‍यापैकी चांगली कामगिरी केली. त्यांच्यासाठी आणखी एक आनंदाच्या गोष्टीची भर म्हणजे विंडोज १० आता जगात सर्वाधिक वापरली जाणारी डेस्कटॉप ऑपरेटिंग सिस्टिम ठरली आहे! ९ वर्षं जुनी असलेल्या विंडोज ७ ला मागे टाकत एकदाची Windows 10 आघाडीवर पोहोचली आहे!

विंडोज १० आता जगातल्या ३९ टक्के डेस्कटॉप कम्प्युटर्सवर इंस्टॉल केलेली आहे. हीच आकडेवारी विंडोज सेव्हनसाठी आता ३७ टक्क्यांवर गेली आहे. विंडोज १० आता तब्बल ७० कोटी डिव्हाईसेसवर सुरू आहे! यामध्ये पर्सनल कम्प्युटर्स, एक्सबॉक्स, टॅब्लेट्स व फोन्सचाही समावेश आहे!

मायक्रोसॉफ्टने विंडोज ७ साठीचा सपोर्ट २०१५ मध्येच थांबवला आहे मात्र तरीही अजून बर्‍याच कम्प्युटर्सवर ही ओएस इंस्टॉल केलेली आहे! अनेकांना अजूनही विंडोज १० च एकंदर रूप किंवा त्यामध्ये असलेल्या बर्‍याच सुविधा आवडत नाहीत/ अडचणीच्या वाटतात. त्यात मायक्रोसॉफ्टने सर्वच यूजर्सना विंडोज १० वर आणण्यासाठी जबरदस्ती केल्याचाही आरोप होतो. न विचारताच अपडेट डाऊनलोड करून इंस्टॉल केल्याच्याही घटना बर्‍याच जणांच्या बाबतीत घडल्या आहेत.

ह्या डेस्कटॉप मार्केटमध्ये आघाडी मिळवली असली तरी मायक्रोसॉफ्टने समोर ठेवलेलं लक्ष अद्याप त्यांना गाठता आलेलं नाही ते म्हणजे 3 वर्षात १०० कोटी डिव्हाईसेसवर विंडोज १० ला पोहोचवणं! असं असलं तरीही मायक्रोसॉफ्टला २०१८ वर्ष पुन्हा उभारी देणारं नक्कीच ठरलं असून बर्‍याच गोष्टींबद्दल मायक्रोसॉफ्ट आता सकारात्मक विचार करत स्वतःमध्ये बदल करत असल्याच दिसून येत आहे…!

Exit mobile version