अॅपल आयफोन फेसटाइममध्ये मोठा बग : कॉल उचलण्यापूर्वीच समोरच्याचा आवाज ऐकू येतोय!

तूर्तास फेसटाईम बंद ठेवण्याचा सल्ला

अॅपलच्या आयफोनवर कॉलिंगसाठी वापरल्या जाणार्‍या फेसटाइम (FaceTime) मध्ये मोठा बग (त्रुटी) असून यामुळे आपण एखाद्या व्यक्तीला कॉल केला आणि त्यामध्ये आणखी एक क्रमांक जोडला तर त्या पहिल्या व्यक्तीने कॉल न उचलताच त्यांच्याकडचा आवाज ऐकू यायला सुरुवात होते! समोरच्याने इनकमिंग कॉल उचलण्यापूर्वीच त्याचा आवाज ऐकू येत असल्याने ही मोठीच त्रुटी म्हणता येईल आणि यामुळे बर्‍यापैकी मोठा धोकाही संभवतो कारण कोणीही कोणत्याही आयफोन असणार्‍या व्यक्तीला कॉल करून त्यांचं बोलणं त्यांना न समजता ऐकू शकेल!

अपडेट १ : तूर्तास अॅपलने ग्रुप फेसटाइम सेवा ऑफलाइन केली असून ही त्रुटी एक सॉफ्टवेअर अपडेटद्वारे एका आठवड्यात दूर केली जाईल असं सांगितलं आहे!

अपडेट २ : हा बग आता iOS च्या नव्या अपडेटमध्ये (iOS 12.1.4) दुरुस्त करण्यात आला आहे.

या बगमुळे प्रायव्हसी (गोपनियेतला) बाधा पोहोचण अगदी स्पष्ट असून अगदी सर्वच iOS युजर्सचं बोलणं ऐकण शक्य आहे! काहीजणांनी तर हे व्हिडिओच्या बाबतीत सुद्धा होत असल्याच सांगितलं आहे जे ऑडिओ पेक्षा अधिक नुकसान करू शकेल! यापासून स्वतःचा बचाव करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे फेसटाइम disable करणं…

9to5Mac या वेबसाइटवर प्रथम ही गोष्ट प्रकाशित करण्यात आली असून त्यांच्या माहितीनुसार iOS 12.1 किंवा नंतरचं अपडेट असलेल्या सर्व फोन्सवर ही त्रुटी पाहायला मिळू शकेल.

खालील प्रमाणे हा बग (त्रुटी) पाहू शकाल :
1. एखाद्या आयफोन असणाऱ्या व्यक्तीसोबत फेसटाइमवरून व्हिडीओ कॉल सुरु करा
2. कॉल डायल होत असताना स्वाईप अप करून ऍड पर्सनवर टॅप करा
3. आता तिथे तुमचा स्वतःचा क्रमांक टाका
4. आता ग्रुप फेसटाइम सुरु झालेला दिसेल ज्यामध्ये तुम्ही आणि मगाशी कॉल केलेली व्यक्ती असाल तर आता त्या व्यक्तीने कॉल अजूनही उचलला नसेल तरीही तुम्हाला त्यांच्या बाजूचा आवाज ऐकू यायला सुरुवात होईल!

यामुळे आता तुम्हाला कोणाचा फेसटाईमद्वारे कॉल येत असेल आणि तुम्ही उचलला नाही तरीही तुमचा आवाज त्यांना ऐकू जात आहे हे लक्षात ठेवा. हीच त्रुटी मॅकवर सुद्धा पाहता येत असून येथेहे तर कॉलसाठी अधिक वेळ लागत असल्यामुळे अधिक धोका संभवतो…!

अॅपलने ही त्रुटी दूर करेपर्यंत तुमच्या फोनमधील फेसटाइम सेवा बंदच ठेवलेली बरी…

यासाठी Settings मध्ये जाऊन FaceTime च स्विच बंद करा.

Exit mobile version