
टेलिकॉम रेग्युलेटर संस्था ट्रायने टेलिकॉम कंपन्यांना आदेश दिले आहेत की त्यांच्याकडे पुरेसा बॅलन्स नसला तरीही त्यांची सेवा खंडित करण्यात येऊ नये. अलीकडे अनलिमिटेड प्लॅन्सच्या नावाखाली बऱ्याच टेलिकॉम कंपन्या ग्राहकांना कमी रिचार्ज ऐवजी अनलिमिटेड पॅक्स जे किमान २८ दिवसांसाठीच वैध आहेत असेच रिचार्ज करा अन्यथा तुमची सेवा खंडित करण्यात येईल असं सुचवत आहेत. त्यावर ट्रायने नाराजी व्यक्त करत नवे आदेश दिले आहेत. याबद्दल काही दिवसांपूर्वीच मराठीटेकने एक लेख प्रकाशित केला होता : सध्याची रीचार्ज प्लॅन्सची स्थिती! : टॉपअप पॅक्स जवळपास बंदच?
ग्राहकांना याबद्दल किमान माहिती तरी द्यायला हवीच असा ट्रायकडून सांगण्यात आलं आहे. जिओमुळे वाढलेल्या स्पर्धेचा परिणाम काही कंपन्या बंद होण्यात तर काही एकमेकांमध्ये विलीन होण्यात झाला आहे. आता एअरटेल, व्होडाफोन, आयडिया पैसे मिळवण्यासाठी असे नवे मार्ग शोधत असल्याचं दिसून येत आहे. मात्र याचा ग्राहकांनाच त्रास होत असल्याचं चित्र समोर आहे. ग्राहकांना रिचार्ज करणं बंधनकारक व्हावं इथपर्यंत प्रकरण आल्यावर ट्रायने ग्राहकांची सेवा बंद करण्याची कृती करण्यास विरोध केला आहे.
या प्रकरणात ग्राहकांना कमीतकमी ठराविक रकमेचा रिचार्ज बंधनकारक केला गेला आहे जेणेकरून कमी वापर किंवा कमी रकमेचा रिचार्ज करणाऱ्या ग्राहकांना अधिक रकमेचा रिचार्ज तोसुद्धा दरमहा करावाच लागेल! आता ट्रायच्या हस्तक्षेपामुळे तरी टेलिकॉम कंपन्यांना शहाणपण येईल ही अपेक्षा…