विंडोज १० मध्ये लवकरच नव्या आयकॉन्स : ऑफिसमधील वर्ड, पॉवरपॉईंटलासुद्धा नवं रूप!

मायक्रोसॉफ्ट लवकरच त्यांच्या विंडोज १० मधील आयकॉन्सना नवं रूप देणार असून याची सुरुवात ऑफिसपासून केली जाणार आहे. याची एक छोटीशी झलक मायक्रोसॉफ्टतर्फे प्रसिद्ध करण्यात आली असून विंडोज १० च्या डिझाईनमध्ये सध्या नसलेली एकसूत्रता आणण्याच्या प्रयत्नात असल्याचं दिसून येत आहे. विंडोज ८ मध्ये अचानक बराच बदल केल्यावर अनेकांनी नाराजी व्यक्त केली होती त्यानंतर मायक्रोसॉफ्टला माघार घेत स्टार्ट मेनू परत जोडावा लागला होता. त्यातही त्यांनी मेट्रो प्रकारचं डिझाईन ठेवलं आणि आता हळूहळू लोकांना सवय होऊन त्यानुसार बदल करत करत आता पारदर्शक विंडो/अॅप्स नंतर आता नव्या आयकॉन्सची ओळख करून देणार आहेत….

ऑफिस ३६५ या त्यांच्या ऑनलाईन/क्लाऊड आधारित ऑफिस सूटमध्ये या नव्या आयकॉन्सचा समावेश प्रथम केला जाईल. याबद्दल एक व्हिडीओ आणि एक पोस्ट प्रसिद्ध करून मायक्रोसॉफ्टने पुढे होणारी बदलाची माहिती दिली आहे. Meet the new icons for Office 365 and Windows 10

विंडोज १० मध्ये अजूनही अशा बऱ्याच आयकॉन्स आहेत ज्या जवळपास १० वर्षे बदलण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे आताच्या नव्या डिझाईननुसार हे बदल नक्कीच स्वागतार्ह असतील. गेल्या काही महिन्यांपासून मायक्रोसॉफ्टने बऱ्याच गोष्टींना नवं रूप देत नावीन्य आणायचा प्रयत्न सुरु केला आहे आणि त्याला वापरकर्त्यांकडूनही चांगला प्रतिसाद मिळताना दिसतोय. सत्या नाडेला यांच्या नेतृत्वात मायक्रोसॉफ्टने एकंदर पुन्हा मोठी भरारी घेण्यास सुरवात केली असून काही दिवसापूर्वीच मायक्रोसॉफ्टने बऱ्याच वर्षांनी भागभांडवलात अॅ पलला जवळपास माग टाकलच असल्याची चर्चा सुरु आहे!

Exit mobile version