अॅपलने यावर्षीसुद्धा टॅब्लेट बाजारातील आघाडी कायम ठेवली असून टॅब्लेट्सची एकूण जागतिक विक्री ८.६% टक्क्यांनी घसरल्याच इंटरनॅशनल डेटा कॉर्पोरेशन तर्फे सांगण्यात आलं आहे. अॅपलच्या नव्या आयपॅडचा प्रोसेसर तर बऱ्याच कॉम्प्युटर्सना मागे टाकू शकेल इतका शक्तिशाली आहे मात्र iOS तितकी परिपक्व नसल्याने त्याचा पूर्ण लाभ घेता येत नाही. अॅपलने अजूनही आयपॅडवर चांगला फाईल मॅनेजर दिलेला नाही. सॅमसंग अजूनही दुसऱ्या क्रमांकावर तर आता अॅमेझॉनने त्यांच्या फायर टॅब्लेट्समुळे तिसरी जागा मिळवली आहे! मायक्रोसॉफ्टचे सर्फेस टॅब्लेटसुद्धा चांगली विक्री करताना दिसत आहेत मात्रं मायक्रोसॉफ्टने इतर मार्केट्सकडे फार लक्ष दिलेलं नाहीय. लॅपटॉप्सची जागा घेण्यात तितके यशस्वी न ठरल्यामुळे आणि फोन्सच्या वाढत्या आकारामुळे टॅब्लेट्सकडे ग्राहक वळत नाहीत असं चित्र दिसू लागलं आहे.
भारतातल्या टॅब्लेट बाजारात २२% हिस्सेदारीसह लेनोवो आघाडीवर असून यांच्या विक्रीत ६% वाढ झाल्याचं सुद्धा सांगण्यात येत आहे! CyberMedia Research च्या “Tablet PC Market Report Review” मध्ये ही माहिती देण्यात आली आहे. सर्वाधिक प्रमाण 4G व 3G टॅब्लेट्सचं आहे आणि Tab 4 मालिका यशस्वी ठरल्याचं सांगण्यात येत आहे. लेनोवो नंतर आयबॉल (१६%), सॅमसंग (१५%) आणि डेटाविंड (१४%) असा प्रत्येकाचा बाजारात हिस्सा असल्याचं माहितीमध्ये सांगण्यात आलं आहे.
सॅमसंग खाली घसरण्याचं कारण त्याच त्याच प्रकारचे टॅब्लेट पुन्हा पुन्हा सादर केले जात असल्याचं समजत आहे. आता Galaxy Tab S4 मुळे थोडंफार यश मिळू शकेल. आयपॅड मात्र किंमतीमुळे भारतात फारसे यशस्वी होत नाहीयेत. तरीही गेल्या चार महिन्यांच्या मानाने यावेळी ५१% वाढ दिसत असल्याचं सांगण्यात येत आहे. शैक्षणिक आणि आर्थिक क्षेत्रामध्येच टॅब्लेट्सचा जास्त वापर पाहायला मिळतो.