खोट्या आणि हानिकारक वेबसाईट/ऑफर्सपासून सावधान!

खोट्या, हानिकारक तसेच हुबेहूब दिसणाऱ्या वेबसाईट वरून लोकांची फसवणूक झालेली आपण ऐकलेच असेल. बऱ्याच वेळेस हॅकर्सकडून नकली वेबसाईटवरून बँकिंग डिटेल किंवा सोशल मीडिया वगैरेचे लॉगिन डिटेल मिळवून त्याचा वापर केला जातो. एवढेच नाही तर आपण अनेकदा सोशल मीडिया  किंवा इन्स्टंट मेसेजिंग प्लॅटफॉर्म (शक्यतो Whatsapp) वर अनेक कंपन्यांचे मोठमोठ्या ऑफर्स, सरकारी योजना (उदाहरणार्थ प्रधानमंत्री आयुष्मान भारत योजना, घर योजना, सायकल इत्यादी) किंवा अन्य गोष्टींबद्दल पाठविलेल्या लिंक्स पाहिल्या असतीलच.

एवढेच काय तर, काही  डाउनलोड करताना आपण हमखास  खोट्या किंवा हानिकारक वेबसाईटवर गेलेला असू शकता अशा वेळेस आपणासमोर पेच निर्माण होतो की वेबसाईटची  दिलेली लिंक खरी आहे हे नक्की कसे ओळखणार? तसेच अशा वेबसाईट जवळपास सारख्याच दिसतात. अशा ठिकाणी आपण लॉगिन डिटेल दिले किंवा दुसरी कोणती खाजगी माहिती दिल्यास समस्या उद्भवू शकतात. असा डेटा विकला सुद्धा जातोच, एवढेच काय तर व्हॉटसअप, फेसबुक सारख्या माध्यमांवर टाकल्या जाणाऱ्या अशा पोस्टद्वारे पैसे कमावले जातात आणि अशा गोष्टी शेअर केल्यास त्यात भरच घातली जाते. यामध्ये समाजात तेढ निर्माण करणाऱ्या गोष्टी सुद्धा असतातच.

 यासाठीच आज आपण याबद्दल कोणती खबरदारी घ्यावी हे पाहुयात…

  • नेहमी URL किंवा वेब अॅड्रेस काळजीपूर्वक पहा. आता समजा https://www.facebook.com हा अॅड्रेस ऑफिशिअल आहे परंतु फसवणूक करणारे facekook.com / facabook.com / faceboke.com अशा पद्धतीच्या वेबसाईटवर घेऊन जाऊ शकतात. यासाठी खासकरून आपल्या नेट बँकिंग वगैरेच्या अधिकृत वेबसाईटवर आहोत ना हे दरवेळेस तपासून पाहावे.
  • त्याचप्रमाणे  https://www.facebook.com असेल तर  https://www.facebook.(याठिकाणी-काहीही).com अशा पद्धतीचे URL.
    उदाहरणच घ्यायचं झालं तर समजा facebook.xyz.com तर येथे या URL द्वारे फेसबुकवर जात नसून xyz.com  या वेबसाईटवर जाऊ. त्या ठिकाणी सुरवातीचा भाग हा सबडोमेन आहे. त्यामुळे केव्हाही URL तपासताना उजव्या बाजूने तपासावा. 
  • आता https एन्क्रिप्शन नसलेल्या साईट्सना not secure असं दाखवायला सुरुवात करण्यात आलेली आहे. बँकिंग, शॉपिंग वेबसाईट ज्यावर पैसे देवाण घेवाण असते त्यांना https असल्याची खात्री कराच.  

( याच पद्धतीने अॅमेझॉन/फ्लिपकार्टवर ऑफर्स, शंभर रुपयांत नवा कोरा फोन, नवीन सरकारी योजना, खूप मोठ्या डिस्काउंटवर गोष्टी मिळणे किंवा अमुक कंपनी तर्फे व्हाउचर मिळतील म्हणून संदेश व्हॉटस्ऍप  किंवा सोशल मीडियावर फिरतातच अशा वेळेस वरीलप्रमाणे काळजीपूर्वक पाहिल्यास आपणास समजेल की जरी अॅमेझॉन/फ्लिपकार्ट अमुक कंपनीचे त्यामध्ये नाव, सरकारी योजना असेल तर त्यासंबंधी शब्द  तिथे दिसले तरी तशापद्धतीचे सबडोमेन ठेवून वेबसाईट वेगळीच असते. उदाहरणार्थ www.amazon.rgtuhwilg.in / www.govermentscheme.dealsshopping.com / www.DmartCoupons.freeshopping.info / www.freeRecharge.rawelitgflqhtgiq5hrew3tg5juwhy.in

अशा वेळेस तुम्हाला खोट्या वेबसाईट वर घेऊन जाऊन एकतर खाजगी माहिती विचारली जाते (जी विकली जाऊन तुम्हाला वेगवेगळ्या कंपन्यांकडून कॉल वगेरे येणे अशा गोष्टी तर घडताता) शिवाय यातून स्वतःच फायदा सुद्धा करून घेतला जातो त्याचबरोबर अनेकदा व्हायरस पसरवले जातात. मध्यंतरी सगळ्या गोष्टीत Indian/भारतीय जोडून त्यांचं मार्केटिंग करून भावनिक गोष्टींचा फायदा घेत डेटा चोरीच्या बऱ्याच घटना घडल्या.

  • Email मध्ये आलेल्या लिंकवर जाताना सुद्धा खबरदारी घ्या तसेच महत्वाचे URL जसे की बँकेची इंटरनेट बँकिंगची वेबसाईट ही स्वतः अॅड्र्स बार मध्ये भरा. 
  • तसेच URL तपासणाऱ्या वेबसाईट  वरूनही याबद्दल खात्री करून घ्या. त्याचप्रमाणे डोमेन सुद्धा तपासा. सरकारी वेबसाइट या शक्यतो gov.in, nic.in इत्यादी डोमेन ने समाप्त होतात त्यामुळे त्याव्यतिरिक्त सरकारी वेबसाइट व योजना, फॉर्म, संदेश असेल तर त्याकडे दुर्लक्ष करा. (हल्ली तर nic.in डोमेन ने सुद्धा काही खोट्या  साईट आहेत) 
  • ww.google.com आता येथे क्लिक केल्यास आपण गुगलवर जाणे अपेक्षित आहे परंतु..क्लिक केल्यानंतर आपणाला गुगल ऐवजी फेसबुकवर पाठवले गेले आहे.  त्यामुळेच URL वर क्लिक केल्यानंतर साईट लोड होताना किंवा झाल्यानंतर पुन्हा URL चेक करायला विसरू नका. (डेस्कटॉपवर असाल तर अशा लिंकवर माऊस घेऊन गेल्यास डाव्या कोपऱ्यात वेब अॅड्रेस समजतोच पण मोबाईलवर त्रास होऊ शकतो)

मराठी टेक तर्फे आपण सर्वांना विनंती आहे की सोशल मीडियावर येणाऱ्या फसव्या ऑफर्स, योजना अशा गोष्टींना बळी पडू नका. वृत्तपत्रे, TV, ऑफिशिअल चॅनेल्स यांवर विश्वास ठेवा. तसेच असे संदेश कोणालाही फॉरवर्ड सुद्धा करू नका जेणेकरून ते पसरणार नाहीत.

जसजसे आपण डिजिटल होत जाऊ व ऑनलाईन बँकिंगपासून बाकी साऱ्या गोष्टी वापरायला लागू तसे अशाप्रकारचे धोके वाढणार आहेतच. त्यासाठीच सतर्क राहणे जरुरीचेच आहे. आपले ऑनलाइन अकाऊंट (फेसबुक,जीमेल, ट्वीटर) सुरक्षित कसे ठेवायचे ? – याबद्दल वाचण्यासाठी येथे क्लिक करा

आपल्या मित्रांना, नातेवाईकांना या लिंक्स पाठवा जेणेकरून ते सुद्धा सावधान राहू शकतील. तसेच टेक जगतातील बातम्यांसाठी आणि असेच लेख वाचण्यासाठी आम्हाला Facebook, Twitter , YouTube अशा ठिकाणी नक्कीच फॉलो करा आणि इतरांनाही सांगा.

Exit mobile version