स्पेसएक्सच्या चंद्रमोहिमेसाठी पहिल्या प्रवाशाच नाव जाहीर : इलॉन मस्कचा नवा प्रोजेक्ट!

SpaceX Dear Moon Marathi

स्पेसएक्स (SpaceX) ने आज चंद्रावर जाणाऱ्या त्यांच्या पहिल्या प्रवाशाची घोषणा केली आहे. जपानी उद्योजक युसाकू मायेजावा (Yusaku Maezawa) २०२३ मध्ये चंद्रावर जाणार आहेत. युसाकू हे जपानच्या ऑनलाईन फॅशन रिटेल वेबसाइट झोझोटाउनचे संस्थापक आहेत. “मी चंद्रावर जाण्याचे निवडले आहे” असे युसाकू यांनी स्पेसएक्सच्या मुख्यालयात झालेल्या कार्यक्रमात सांगितले. युसाकू स्वतःसोबत आणखी ६-८ लोकांना घेऊन जाणार आहेत यामध्ये जगभरातील कलाकार जसे की संगीतकार, चित्रकार, चित्रपट दिग्दर्शक, फॅशन डिझायनर इत्यादींचा समावेश असणार आहे.

‘डिअर मून’ (DearMoon) असे या प्रोजेक्टचे नाव असणार असून युसाकू त्यांच्यासोबत घेऊन जाणाऱ्या कलाकार सदस्यांची निवड प्रक्रिया लवकरच चालू करणार आहेत. यासाठी जगभरातील आर्टिस्टना याचा भाग होता येईल तर युसाकू स्वतः सुद्धा काही कलाकारांना निमंत्रण देणार आहेत. त्यानंतर ट्रेनिंग प्रोग्रॅमला सुरवात होईल. जवळपास ५ ते ६ दिवस ही मोहीम चालेल. मोहिमे दरम्यान तसेच पृथ्वीवर परतल्यानंतर सहभागी आर्टिस्टना त्यांच्या अनुभवातून व्यक्त होण्यास सांगितले जाईल व त्यांनी तयार केलेले साहित्य प्रसिद्ध केले जाईल.

या प्रोजेक्टसाठी स्पेसएक्सच्या BFR (Big Falcon Rocket) चा वापर केला जाणार असून काही दिवसांपूर्वी सादर करण्यात आलेल्या BFR मध्ये अनेक बदल करण्यात आले आहेत. BFR हे स्पेसएक्सचे सर्वात मोठं व जास्त क्षमता असणारे रॉकेट आहे. जे ११८ मीटर उंच असून, यामधून १०० टन पेलोड, LEO ( Lower Earth Orbit) पर्यंत वाहण्याची त्याचबरोबर पुन्हा वापर करता येण्याची याची क्षमता आहे.

विमानातून प्रवास करण्याएवढी सोपी ही मोहीम नसून यामध्ये अनेक धोके उद्भवतील त्याचबरोबर २०२३ मध्येच खात्रीशीर ही मोहीम पार पडेल हे सांगता येणार नाही असे इलॉन मस्क यांनी सांगितले. परंतु स्पेसएक्सने फक्त १० वर्षांत केलेली प्रगती पाहता हे संभव असेल. डिअर मून प्रोजेक्ट साठी किती खर्च येईल तसेच युसाकू यांनी किती पैसे दिले आहेत याबद्दल काहीही सांगण्यात आलेले नाही. परंतु सर्व आर्टिस्ट साठी ही मोहीम फ्री असेल.

डिअर मून प्रोजेक्टमध्ये सहभागी होणारे आर्टिस्ट तसेच भविष्यातील अपडेट्स साठी dearmoon.earth वेबसाइट तयार करण्यात आली आहे. त्याचबरोबर #dearmoonproject म्हणून ट्विटर आणि इंस्टाग्राम अकाउंट सुद्धा उघडण्यात आले आहेत. या प्रोजेक्ट बद्दल अपडेट्स मिळविण्यासाठी पुढील ट्विटर आणि इंस्टाग्राम अकाउंट आपण फॉलो करू शकता.

ट्विटर – @dearmoonproject / Yusaku Maezawa 
इंस्टाग्राम – @dearmoonproject / Yusaku Maezawa

संपूर्ण कार्यक्रम पुढील लिंक वरून पाहता येईल. First Private Passenger on Lunar BFR Mission


संबंधित लेख :

search terms : spacex dear moon mission project first passenger announcement elon musk marathi

Exit mobile version