भारतीय पोस्ट विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेचे (IPPB) चे अनावरण आज पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात आले आहे. पोस्ट ऑफिस नेटवर्कच्या मध्यातून ही सेवा घरोघरी पोहचणार आहे, खासकरून ग्रामीण भागात असणाऱ्या नेटवर्कमुळे तसेच पोस्टमन आणि ग्रामीण डाक सेवकांमुळे जास्त लोकांपर्यंत पोहचण्यास IPPBला मदत होईल. आजपासून ६५० शाखा आणि ३२५० ऍक्सेस पॉईंट्सद्वारे IPPB उपलब्ध होईल तर ३१ डिसेंबर २०१८ पर्यंत भारतातील १.५५ लाख पोस्ट ऑफिसच्या माध्यमातून IPPB ग्राहकांपर्यंत पोहचेल.
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक ही सामान्य बँकेसारखीच असून यामध्ये बचत/चालू खाते ओपन करता येईल. पेमेंट्स बँक मध्ये १ लाखांपर्यंतच डिपॉझिट स्वीकारले जातील. १ लाखांपेक्षा जास्त रक्कम असणारे खाते पोस्ट ऑफिस बचत खात्यामध्ये परावर्तित केले जाईल. अन्य बँकाकडून मिळणाऱ्या जवळपास सर्वच सोयी पोस्ट बँकेद्वारे मिळवता येतील जसे की मोबाइल पेमेंट्स, मनी ट्रान्सफर त्याचबरोबर मायक्रो ATM ची सुविधा, नेट बँकिंग, बिल पेमेंट्स, रिचार्ज यांचा सुद्धा समावेश असेल.
आधारचा वापर करून खाते उघडता येईल तर QR कोड आणि बायोमेट्रिकचा व्यवहार, पडताळणीसाठी वापर केला जाईल. पोस्ट पेमेंट्स बँकद्वारे ४% व्याजदर बचत खात्यासाठी दिले जाईल. स्वतःहून कर्ज, इन्शुरन्स देण्याची अनुमती बँकेला नसली तरी PNB, Bajaj Allienz लाइफ इन्शुरन्स च्या माध्यमातून कर्ज आणि इन्शुरन्स देण्यासाठी बॅंकेकडून भागीदारी करण्यात आली आहे.
डिपार्टमेंट ऑफ पोस्ट, मिनिस्ट्री ऑफ कम्युनिकेशन अंतर्गत इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेची स्थापना करण्यात आली असून यामध्ये भारत सरकारचा १०० टक्के हिस्सा आहे. ३० जानेवारी २०१७ रोजी रायपूर आणि रांची येथे प्रायोगिक तत्वावर IPPB सेवा चालू करण्यात आली होती.