ट्विटर अकाऊंट व्हेरिफिकेशन म्हणजे काय? : ट्विटर या सोशल मीडिया वेबसाइटवरील प्रसिद्ध खाती ज्यामध्ये इतर वापरकर्त्यांना रस असेल त्यांना ट्विटरकडून व्हेरिफाय केलं जातं म्हणजेच एमुक एखादं अकाऊंट हे त्या प्रसिद्ध व्यक्तीचं स्वतःचच अकाऊंट आहे हे यामधून दर्शवलं जातं. जेणेकरून दुसर्या व्यक्तीने त्या व्यक्तीच्या नावे अकाऊंट काढून काहीही वाईट साईट माहिती पसरवू नये आणि त्या व्यक्तीला करायच्या असतील त्या ट्विट्स त्या व्यक्तीकडून अधिकृतरित्याच करण्यात आल्या आहेत हे त्यांच्या अनुसारकांना/फॉलोअर्सना समजेल.
व्हेरिफाईड अकाऊंट समोर ब्ल्यु टिक/निळ्या रंगाची टिक असते. फेसबुक, इंस्टाग्राम, यूट्यूब इथेसुद्धा व्हेरिफाईड अकाऊंटसमोर टिक पाहायला मिळते.
कोणती अकाऊंट्स व्हेरिफाय केली जातात ? : ट्विटर अशा खात्यांना व्हेरिफाय करतं ज्या खात्यांमध्ये लोकांना रस/आवड/इंटरेस्ट आहे जसे की संगीत, चित्रपट, फॅशन, सरकारी, राजकीय, धर्म, माध्यम, खेळ, उद्योग अशा क्षेत्रामधील ट्विटरवर उपस्थित असलेल्या व्यक्ती.
ट्विटर अकाऊंट व्हेरिफाईड का करावं ? : जरी ट्विटरने असं सांगितलं असेल की अकाऊंट व्हेरिफाईड असणं याचा अर्थ ते अकाऊंट ट्विटरकडून कोणत्याही प्रकारे पुरस्कृत केलेलं असणं नाही तरीही खोट्या खात्यांना आळा घालून खर्या व्यक्तींची खरी अकाऊंट्स आणि त्यांच्या ट्विट्स लोकांसमोर आणणं सोपं होतं. काही वर्षांपूर्वी अनेक सेलेब्रिटीजना अशा नकली खात्यांमुळे नाहक त्रास सहन करावा लागला होता.
सोबतच जर तुमचा ब्रॅंड/उद्योग व्हेरिफाईड असेल तर त्याची एक विश्वासू प्रतिमा तयार होते ज्यामुळे फॉलोअर्स मिळवणं, त्यांच्या संपर्कात राहणं सोपं होतं. आता तर बर्याच उद्योगांनी त्यांच्या सेवांबद्दल मदत ट्विटरद्वारे पुरवण्यास सुरुवात केली आहे! यामध्ये ग्राहकांची फसवणूक टाळण्यासाठी व्हेरिफाईड अकाऊंटची नक्कीच मदत होते.
ट्विटर अकाऊंट व्हेरिफाय कसं करायचं ? : काही वर्षापूर्वी ट्विटर स्वतःच सेलेब्रिटीजना व्हेरिफाईड करून द्यायचं. त्यानंतर हे त्यांना सर्वांसाठी खुलं केलं आणि नंतर पुन्हा सर्वांकडून याबद्दल अॅप्लिकेशन्स घेणं थांबवलं.
आता सद्य स्थितीला ट्विटर कोणाकडूनही याबद्दल अॅप्लिकेशन्स स्वीकारत नाही! लवकरच ते याबाबत काही मार्ग काढण्याच्या प्रयत्नात आहेत.
- तुमची प्रोफाइल अपडेट करा. (प्रोफाइल पिक्चर, कव्हर फोटो, नाव, बायो, जन्म दिनांक, वेबसाइट, लोकेशन इ गोष्टी भरून घ्या. सर्व माहिती योग्य असल्याची खात्री करा.)
- ट्विटर अकाऊंटला फोन क्रमांक आणि ईमेल अॅड्रेस जोडून ते व्हेरिफाय करून घ्या.
- सर्व ट्विट्सना सेटिंग मध्ये Public असं सेट करा.
- ह्या लिंकला भेट देऊन योग्य ती माहिती भरा आणि सबमिट करा.
(सध्या ह्या फॉर्मद्वारे व्हेरिफिकेशन बंद करण्यात आलं याची नोंद घ्यावी)
जर तुमचं वैयक्तिक खातं असेल तर तुम्हाला पासपोर्ट/ड्रायव्हर लायसन्स असा ID मागितला जाऊ शकतो.
अकाउंट व्हेरिफाईड करताना वापरलेलं युजरनेम, नाव, प्रोफाइल पिक्चर हे सर्व शक्यतो खऱ्या नावाला, फोटोला जुळेल असंच वापरलेलं असावं. एकदा फॉर्म पाठवला कि ट्विटर ३० दिवसात त्यांचा निर्णय कळवेल
सध्या जर ट्विटर फॉर्म स्वीकारतच नसेल तर कसं व्हेरिफाय करायचं ? : यासाठी काही PR कंपन्यांची मदत घ्यावी लागते. जर आपण सेलेब्रिटी/प्रसिद्ध व्यक्ती असाल तर अशा PR (पब्लिक रिलेशन्स) कंपन्याशी संपर्क साधा. याबाबत PR कंपनी त्या क्षेत्रातील विश्वासू नाव आहे का हे पाहून घ्या. बऱ्याच वेळा या माध्यमातून सुद्धा अनेकांची फसवणूक होते म्हणून काळजी घ्या. अलीकडे मराठीमध्ये सुद्धा अशा काही कंपन्या सुरु झालेल्या आहेत. त्यांच्याशी संपर्क साधून आपली जी काही गरजेची माहिती असेल ती पुरवून अकाउंट व्हेरिफाईड करून घेऊ शकता.
ट्विटरवरील अधिकृत हॅन्डल जे फक्त व्हेरिफाईड अकाउंट्सना फॉलो करतं Twitter Verified
व्हेरिफाईड अकाउंट्सने त्यांचा बॅज काढला घेतला जाऊ नये म्हणून काय काळजी घेतली पाहिजे ? :
ट्विटरने व्हेरिफाईड अकाउंट्सचा व्हेरिफाईड बॅज काढून घेण्याचा हक्क स्वतःकडे ठेवला आहे.
खालील पैकी कोणत्याही कारणाने ट्विटर यूजरकडून उल्लंघन झाल्यास त्यांचं व्हेरिफाईड स्टेट्स काढण्यात येतं!
- एखाद्या व्यक्तीच नाव वापरून मुद्दाम लोकांना फसवणं
- द्वेष/हिंसा पसरवणारी ट्विट्स करणं, वंश/धर्म/पंथ/देश/वय/लिंग/दिव्यांगत्व/आजार यावरून धमक्या देणं, यापॆकी गोष्टींना पाठिंबा देणाऱ्या संस्थांचं समर्थन करणं
- ट्विट्सद्वारे एखाद्याचा मानसिक छळ करणं
- थेट/अप्रत्यक्षपणे एखाद्याला/समूहाला शारीरिक हिंसेसाठी धमकावणं/उकसवणं किंवा दहशतवादाचं समर्थन करणं
- ट्विटरच्या नियमावलीचा भंग करणं
व्हेरिफाईड अकाउंट्सच्या नावे गैरवापर कसा होतो? : आता सध्या अशा बऱ्याच वेबसाईट उपलब्ध आहेत ज्याद्वारे आपण एखाद्याचे युजरनेम टाकून त्यांचा प्रोफाइल फोटो टाकून त्यांच्या नावे नकली ट्विट तयार करू शकतो. गेल्या काही महिन्यात अशा नकली ट्विट्सद्वारे तयार केलेल्या स्क्रिनशॉटमुळे अनेक सेलिब्रिटीजना नाहक त्रासाला सामोरं जावं लागलं आहे. स्क्रिनशॉटमध्ये व्हेरिफाईड अकाउंट्सची ब्ल्यू टिक दिसते ती खरी असेलच असं नाहीय. त्यामुळे मराठीटेकतर्फे आमचं सांगणं आहे कि स्वतः त्या व्यक्तीच्या ट्विटर अकाउंटवर जाऊन खात्री केल्याशिवाय असे स्क्रिनशॉट्स पुढे पाठवू नका.
search terms : how to verify twitter account How to get verified account blue tick badge