गेली कित्येक वर्षे इंटेल कम्प्युटर चिप्स बनवण्यात प्रथम स्थानी कायम होती. मात्र गेल्यावर्षीच्या कमाईबद्दल काल सॅमसंगने रिपोर्ट्स जाहीर केल्यानंतर सॅमसंगने आता चिप मार्केटमध्ये इंटेलला मागे टाकलं असल्याचं स्पष्ट झालं आहे! १९९२ पासून इंटेलची आघाडी आता सॅमसंगने संपुष्टात आणली आहे. विक्री संबंधित माहिती प्रसिद्ध केल्यानंतर ही गोष्ट काल स्पष्ट झाली आहे.
आता सॅमसंगने या क्षेत्रातसुद्धा आघाडी घेतली असून २०१७ या वर्षी 69.1 बिलियन डॉलर्स उत्पन्न मिळवलं आहे तर इंटेलचं त्याच बाबतीत 62.8 बिलियन डॉलर्स इतकं उत्पन्न मिळालं आहे. इंटेलच्या गेल्यावर्षी सुरु झालेल्या अडचणी संपण्याच नाव घेत नाहीयेत. आधी AMD च्या Ryzen प्रोसेसरना वाढता प्रतिसाद त्यानंतर काही महिन्यापूर्वी आलेली प्रोसेसरमध्ये सापडलेले स्पेक्टर आणि मेल्टडाउन दोष आणि आता हे त्यांचं मुख्य लक्ष्य असलेलं चिप मेकिंग मार्केट सुद्धा सॅमसंगने हिरावलं आहे! इंटेलची वाट येत्या काळात अधिक बिकट होणार आहे. सॅमसंगने चिप्स सोबत मेमरी DRAM, NAND मार्केटमध्ये सुद्धा मोठी आघाडी घेतली आहे. बऱ्याच फोन्समध्ये सॅमसंगची रॅम पाहायला मिळते. सोबत सॉलिड स्टेट ड्राइव्ह (SSD) मध्ये सुद्धा सॅमसंगलाच मोठा प्रतिसाद मिळत आहे! गेल्या वर्षभरात सॅमसंगच्या नफ्यात तब्ब्ल ६४% वाढ झाल्याचं नोंदवलं आहे!