बिल गेट्स : एक टेक जिनियस : टेक गुरु

बिल गेट्स

बिल गेट्स हा अमेरिकन बिझिनेसमन, संशोधक, संगणक प्रोग्रामर आणि इन्व्हेस्टर आहे. त्याच्याकडे एकही पदवी नसून तो सध्या जगातला सर्वात श्रीमंत व्यक्ती आहे. त्याने २०व्या वर्षीच एका लहान गॅरेज मध्ये पॉल अॅलन सोबत ‘मायक्रो-सॉफ्ट’ नावाची सॉफ्टवेअर कंपनी सुरु केली होती, जी आज जगातील सर्वात प्रभावशाली आणि महाबलाढ्य सॉफ्टवेअर कंपनी म्हणून ओळखली जाते. आणि आणखी एक गोष्ट म्हणजे १९८७ पासून ‘फोर्ब्ज’ या मासिकाने सादर केलेल्या जगातील सर्वात श्रीमंत लोकांच्या प्रत्येक यादीत त्याचे नाव असून, १९९४ पासून २०१४ पर्यंत फक्त दोन वर्षे सोडून तो यादीत पहिल्या क्रमांकावर आहे. त्याच्या बिझीनेस करण्याच्या पद्धतीमुळे त्याच्यावर अनेकांनी टीका केली, कोर्टात केस केल्या. स्टीव जॉब्ज आणि बिल गेट्स यांच्यामधील दोस्ती, दुष्मनी, हेवे-देवे , एकमेकांवर केलेले आरोप-प्रत्यारोप खूपच प्रसिद्ध आहेत. बिल गेट्सच्या जवळचे लोक ‘तो समजण्यासाठी खूप अवघड आहे’ असे म्हणतात. त्यामुळेच बिल गेट्सच्या आयुष्याबद्दल जाणून घेणे हे खूपच रोमांचकारक आहे.

बिल गेट्सचा जन्म २८ ऑक्टोबर, १९५५ साली सिएटल या वॉशिंग्टन मधील शहरात झाला. बिलचे वडिल विलियम हेन्री गेट्स II हे एक निष्णात वकील होते. आणि आई मेरी ही शिक्षिका होती. बिलला दोन बहिणी होत्या. बिलचे आई-वडिल हे त्यांच्या मुलांच्या अभ्यासाबाबत खूप दक्ष असत. बिल गेट्स हा लहानपणी खूपच शांत आणि एकाकी राहात असे, पण तो खूपच अभ्यासू होता. तो घरीदेखील जास्त बोलत नसे. जेव्हा बिल १३ वर्षाचा झाला तेव्हा, त्याला सिएटल मधील एका शाळेत घालण्यात आले. तेथे त्याने प्रत्येक विषयात असलेले नैपुण्य दाखवले. तेथे त्यांना काही वेळ संगणक शिकवला जात असे. अशा तऱ्हेने बिलची संगणकाशी ओळख झाली. तो पहिल्यांदाच संगणक पाहत होता. बिल संगणक काय काय करू शकतो हे जाणून खूप प्रभावित झाला. तो त्याचा जास्तीत जास्त वेळ कॉम्पुटर लॅब मध्ये घालवू लागला.

तो आता बेसिक (BASIC) कॉम्पुटर लँगवेज शिकत होता. आणि त्याने त्याच वर्षी Tic-Tac-Toe हा गेम तयार केला, ज्यामध्ये आपण संगणकाविरुद्ध खेळू शकतो. त्याने आता स्वतःचे प्रोग्राम तयार करायला सुरुवात केली होती. याच काळात त्याची भेट पॉल अॅलन या त्याच्याहून दोन वर्षांनी सिनिअर विद्यार्थ्याशी झाली. दोघांना पण संगणकाविषयी असलेल्या आवडीमुळे त्यांची मैत्री जमली. पण त्या दोघांचा स्वभाव हा खूप वेगळा होता. पॉल अॅलन हा अंतर्मुख आणि थोडा बुजरा होता. तर बिल हा चिडखोर आणि आक्रमक होता. कधी कधी त्या दोघांमध्ये देखील भांडणे होत असत. एके दिवशी तर हा वाद एवढा वाढला होता कि पॉल ने बिल ला कॉम्पुटर लॅब मध्ये येण्यास बंदी घातली होती. पण थोड्याच काळात सर्व काही सुरळीत होत असे. आता ते दोघ मिळून संगणकावर काम करत असत, प्रोग्राम ‘डीबग’ (Debug) करत असत.
पॉल अॅलन आणि बिल गेट्स

त्या कॉलेज चा एक प्रोगाम होता कि ज्याचा उपयोग करून विद्यार्थ्यांना क्लास मध्ये बसवले जात असे. बिल ने तो प्रोग्राम हॅक केला होता कि जेणेकरून त्याला सुंदर मुलींसोबत बसता येईल. १९९० साली त्या दोघांनी मिळून ‘Traf-o-Data’ हा प्रोग्राम तयार केला, जो सिएटल शहरातील ट्राफिक सिग्नल ची देखरेख करत असे. यासाठी त्यांना $२०००० मिळाले होते. अशा प्रकारे बिल , १७व्या वर्षीच बिजिनेस मध्ये शिरला. त्याला आणि अॅलन ला मिळून एक कंपनी काढायची होती. पण वडिलांच्या इच्छेमुळे त्याने पुढचे शिक्षण घ्यायचे ठरवले. SAT (Scholarship Aptitude Test) या परीक्षेत त्याला १६०० पैकी १५९० गुण मिळाले होते. म्हणजे त्याचा IQ जवळपास १७० होता. त्याने पुढे हॉवर्ड विद्यापीठात शिकायचे ठरवले. 

               पण वडिलांच्या इच्छेमुळे त्याने कायद्याचे शिक्षण घ्यायचे ठरवले. पण हॉवर्ड मध्ये असताना तो क्लास वगैरे काही करत नसे, दिवसभर कॉम्पुटर लॅब मध्ये बसून राहात असे. त्याला असे पाहून अनेकजणांनी त्याला ‘कॉम्पुटर सायंस’ ला प्रवेश घेण्यास सुचविले. आणि शेवटी त्याने कॉम्पुटर सायंस ला प्रवेश घेतला. आणि येथेच त्याची ओळख स्टीव बाल्मर सोबत झाली, आणि हाच स्टीव बाल्मर पुढे मायक्रोसॉफ्ट चा मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) होणार होता. या काळात त्याने ‘पॅन केक’ नावाचा एक अल्गोरिदम तयार केला होता, जो एक नवीन रिसर्च होता आणि पुढे तो पब्लिश देखील झाला. याकाळात देखील तो पॉल सोबत संपर्कात होता. पॉल त्यावेळी कॉलेज सोडून ‘हनीवेल’ कंपनीत रुजू झाला होता. पुढे बिल देखील या कंपनीत रुजू झाला. १९७४ मध्येच MITS चा Altair ८८०० (इंटेल चीप सोबत) हा मिनी कॉम्पुटर बाजारात येणार होता. त्यामुळे या दोघांनी त्यांना फोन करून ‘तुमच्या कॉम्पुटरवर चालणारे सॉफ्टवेअर आमच्याकडे आहे, तुम्हाला पाहिजे असेल तर आम्ही देऊ’, असे सांगितले. त्यांनीदेखील पॉल आणि बिलला सॉफ्टवेअर तपासून पाहण्यासाठी बोलावले. पण गंमत म्हणजे त्यावेळी यांच्याकडे सॉफ्टवेअर तयार देखील नव्हते. त्यानंतर त्या दोघांनी मिळून पुढचे दोन महिने अतिशय मेहनत घेऊन हॉवर्ड कॉलेजच्या लॅबमधील संगणकावरच सॉफ्टवेअर तयार केले. जेव्हा त्या सॉफ्टवेअरची Altair वर चाचणी करण्यात आली तेव्हा ते चांगले चालले. तेव्हा पॉल MITS ला रुजू झाला आणि बिलने देखील हॉवर्ड येथील शिक्षणाला रामराम ठोकला आणि पॉल सोबत काम करण्यासाठी गेला. आणि त्या दोघांनी मिळून १९७५ साली, ‘मायक्रो-सॉफ्ट’ हि कंपनी सुरु केली. मायक्रो-सॉफ्ट ने अनेक इतर कंपन्यांसाठी देखील सॉफ्टवेअर लिहून दिले. पण काही काळामध्येच कंपनीच्या नावातील समास चिन्ह काढून टाकण्यात आले आणि २६ नोव्हेंबर,१९७६ साली कंपनीचे नाव अधिकृतरीत्या ‘मायक्रोसॉफ्ट’ झाले. पुढे बिलचे सॉफ्टवेअर बांधणीतले कौशल्य आणि व्यावसायिक चातुर्य पाहून त्यालाच कंपनीचा मुख्य करण्यात आले. आणि त्यावेळी त्याची संपत्ती होती $२.५ दशलक्ष होती, आणि वय होते फक्त २३ वर्ष.
मायक्रोसॉफ्ट स्टाफ (सुरवातीचा काळ) 

तो आता पूर्णपणे मायक्रोसॉफ्टला आघाडीवर ठेवण्याचा प्रयत्न करत असे. सॉफ्टवेअर कोड दुसऱ्यांना देण्याआधी तो कोडमधील प्रत्येक लाईन तपासत असे. तो आता एक क्षणदेखील वाया घालवत नसे. कधीकधी तर तो त्याचा कामात एवढा व्यस्त असत आणि कधी एकदा झोपायची वेळ झाली हेदेखील कळत नसे. आणि जास्त वेळ जावू नये म्हणून तो ऑफिसमध्येच त्याच ठिकाणी थोडावेळ टेबलखाली झोपत असे. आणि जाग आल्यावर लगेच काम सुरु करत असे. आणि कंपनीतील इतर कर्मचारी देखील कंपनीसाठी कठोर मेहनत घेत असत. यामुळे मायक्रोसॉफ्ट ची उत्पादकता चांगली होत गेली. आणि मायक्रोसॉफ्ट यशस्वी होऊ लागली. नोव्हेंबर १९८० मध्ये IBM ला देखील त्यांच्या PC वर ऑपेरिटींग सिस्टिम (OS) पाहिजे होती. मायक्रोसॉफ्टने त्यासाठी नवीन MS-DOS हि OS बाजारात आणली आणि ती कॉपीराईट केली. तो कॉम्पुटर हे एक पूर्णपणे क्रांतिकारी उत्पादन होते. आणि त्यामुळे IBM आणि मायक्रोसॉफ्ट, दोघांचीदेखील खूप भरभराट झाली. मायक्रोसॉफ्ट चा दबदबा सॉफ्टवेअर च्या क्षेत्रात वाढत चालला होता.

स्टीव जॉब्स आणि बिल गेट्स 

याच काळात स्टीव जॉब्ज च्या अॅपल कंपनीला देखील त्याच्या हार्डवेअर वर चालण्यासाठी एक नवीन OS पाहिजे होती. आणि अॅपल च्या Mac वर चालणारी OS बनवण्याचे काम तसेच इतर सॉफ्टवेअर बनवण्याचे काम मायक्रोसॉफ्टने घेतले. त्यावेळी स्टीव आणि बिल दोघेही चांगले मित्र होते. आतापर्यंत जगातील ३०% संगणकावर MS-DOS वापरली जात होती. पण त्याच काळात मायक्रोसॉफ्ट देखील स्वतःची नवीन OS तयार करत होती, आणि त्यांनी याबाबत प्रचंड गुप्तता पाळली होती. अॅपल च्या सॉफ्टवेअर बांधणीमध्ये आणि मायक्रोसॉफ्ट च्या नवीन OS च्या बांधणीमध्ये काही सॉफ्टवेअर अभियांत्रिकदेखील काही प्रमाणात तेच होते. बिलने अॅपलला त्यांच्या OS ची आणि इतर सॉफ्टवेअरची कॉपीराईट करण्यास सुचवले पण अॅपलने त्याकडे दुर्लक्ष केले. आणि पुढे अॅपलच्या या एकाच चुकीमुळे मायक्रोसॉफ्ट प्रचंड यशस्वी होणार होती आणि बिल गेट्स हा जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती होणार होता. याचाच फायदा घेऊन बिल गेट्सने आणि मायक्रोसॉफ्टने नोव्हेंबर १९८५, साली ‘विंडोज’नावाची OS बाजारात आणली. जेव्हा स्टीव जॉब्जला कळाले कि Mac मध्ये आणि विंडोज मध्ये भरपूर सारखेपणा आहे, तेव्हा मात्र तो भडकलाच. आणि त्याने मायक्रोसॉफ्टला कोर्टात खेचण्याची धमकी दिली, पण उलट मायक्रोसॉफ्टनेच त्यांना Mac चे सॉफ्टवेअर बांधणीचे काम थांबवण्याची धमकी दिली, नाहीतर Mac च्या मायक्रोसॉफ्ट आधारित सॉफ्टवेअर बाजारात आणण्यास उशीर झाला असता. पण शेवटी अॅपल ने मायक्रोसॉफ्टला कोर्टात खेचलेच. पण मायक्रोसॉफ्टने आपली बाजू ठामपणे मांडली. ‘जरी त्या दोन्ही OS वापरण्यास सारख्या वाटत असल्या तरी दोन्ही OS च्या कार्यपद्धती पूर्णपणे वेगळ्या होत्या’, हे कोर्टात पटवून देण्यात मायक्रोसॉफ्ट यशस्वी झाली. आणि थोडा भुर्दंड भरून विजय मिळवला. आणि येथूनच स्टीव जॉब्ज आणि बिल गेट्स यांची दुष्मनी सुरु झाली होती.

यानंतर मायक्रोसॉफ्ट आणि बिल गेट्स या दोघांनीही मागे वळून पाहिले नाही. १९८६ मध्ये बिल गेट्स ने मायक्रोसॉफ्ट चे शेअर्स विकायला काढले आणि तो मिल्येनिअर बनला. मायक्रोसॉफ्टच्या शेअर्स मध्ये बिलचा ४९% वाटा होता. आणि नंतर १९८७ मध्ये, मायक्रोसॉफ्टच्या शेअर्स च्या किमतीत खूप वाढ झाली आणि बिल गेट्स वयाच्या ३१ व्या वर्षीच बिल्येनिअर बनला. तेव्हापासून बिल गेट्स फोर्ब्जच्या सर्वात श्रीमंत लोकांच्या यादीत आहे, आणि त्यापैकी दोन वर्षे सोडून तो १९९४ – २०१४ सलग १६ वेळा आघाडीवर होता. त्यानंतर तो मायक्रोसॉफ्टच्या आणखी काही कारभाराचा मुख्य झाला. त्यावेळी तो जगातल्या प्रत्येक संगणकावर विंडोज OS असल्याची स्वप्ने पाहत होता.

१९८९ मध्ये त्याची भेट मायक्रोसॉफ्टमधीलच मेलिंडा नावाच्या कार्यकारी अधिकारी सोबत झाली. मेलिंडा ही सुंदर तसेच हुशार देखील होती. त्या दोघांमध्येही सारखे गुण होते, आणि आवडदेखील सारख्याच होत्या आणि त्यामुळे दोघांमध्ये प्रेम झाले. आणि त्यांनी १ जानेवारी, १९९४ ला लग्न केले. त्यांना १९९६ ला पहिली मुलगी झाली. त्यांनतर १९९७, बिल गेट्स आपल्या कुटुंबासोबत मेडिना या वाशिंग्टन येथील आपल्या ६६००० Sq.ft च्या घरात राहायला गेला. या दरम्यान विंडोजच्या OS ची नवीन नवीन वर्जन उपलब्ध होत गेली आणि विंडोज घराघरात येवू लागली होती. आणि बिल देखील आता प्रसिद्ध होत होता. आणि तेव्हापासून मायक्रोसॉफ्टने सॉफ्टवेअर क्षेत्रात पूर्णपणे कब्जा केला आहे.

बिल गेट्सचं अवाढव्य घर 

बिल गेट्स ने अतिशय चाणाक्षपणे व्यवहार केला. त्या काळी कोणते एखादे नवीन उत्पादन प्रसिद्ध होऊ लागले तर मायक्रोसॉफ्ट लगेच ते विकत घेत असत किवा त्याला जोरदार टक्कर देत असे. त्यावेळेपर्यंत मायक्रोसॉफ्टमध्ये कर्मचारी देखील मोठ्या प्रमाणत आले होते. ते मायक्रोसॉफ्ट स्पर्धकांना सरळ उत्पादन विकण्यास सांगत किंवा टक्कर देण्यास तयार राहण्यास सांगत. आणि मायक्रोसॉफ्ट लगेच मोठ्या मानवीशक्तीमुळे ते सॉफ्टवेअर मायक्रोसॉफ्ट लगेच तयार करत असे. या बिल गेट्सच्या अशा व्यावसायिक धोरणांमुळे बिल गेट्स वर टीकादेखील करण्यात आल्या आहेत. पण खर तर मायक्रोसॉफ्टची OS, तसेच इतर सॉफ्टवेअर आणि अशा धोरणांमुळे मायक्रोसॉफ्ट आतापर्यंत आघाडीवर आहे. बिल गेट्स मायक्रोसॉफ्टच्या विंडोज OS मध्ये नवीन नवीन एवढी वैशिष्ट्य मोफत देत होता कि इतर अॅप्लीकेशन सॉफ्टवेअर निर्माण करणाऱ्या कंपन्याचा धंदा बुडत चालला होता आणि त्यांनी देखील बिल गेट्सवर कोर्टात केस ठोकली होती. अशा पद्धतीने बिल गेट्सने सॉफ्टवेअर क्षेत्राचा कायापालट केला.

बिल गेट्स हा दानशूर देखील आहे, आणि भरपूर समाजसेवा करतो. त्याची गेट्स फौंडेशन हि दरवर्षी WHO (World Health Organization) या जागतिक संस्थेपेक्षा जास्त पैसे लोकांच्या आरोग्यावर खर्च करते. त्याने २०१४ साली मायक्रोसॉफ्ट मुख्य कार्यकारी पदाचा राजीनामा दिला, आणि आता तो गेट्स फौंडेशन च्या कामात व्यग्र आहे. त्याने त्याची अर्धी संपत्ती समाज कल्याणासाठी दान केली आहे. त्याच्या रोजच्या जीवनाबद्दल जाणून घेण्यासाठी गेट्सनोट्स.कॉम (www.gatesnotes.com) या साईट ला भेट द्या.

(माजी राष्ट्रपति प्रतिभा पाटील यांच्याकडून इंदिरा गांधी शांतता पुरस्कार स्वीकारताना व इंग्लंडच्या राणीकडून नाइटहूड किताब स्वीकारताना)  
त्याच्या आरामदायी आयुष्याबद्दलच्या कल्पना देखील खूप वेगळ्या आहेत. एका पत्रकाराने त्याला त्याची आरामदायी आयुष्याबद्दलची कल्पना काय आहे असे विचारल्यावर त्याने पुस्तके, सीडी-डीव्हीडी आणि बर्गर असे उत्तर दिले होते.

बिल गेट्स यांच्या सोशल मीडिया लिंक्स :

या पोस्टचे लेखक : कौस्तुभ शिंदे 

(सदर लेखात काही चुकीची माहिती आढळल्यास किंवा लेखामध्ये काही बदल हवा असल्यास आम्हाला कळवा. तसेच तुम्हाला कोणत्या टेक गुरु बद्दल माहिती हवी आहे ती कमेंट बॉक्स मध्ये किंवा इमेलने कळवा. तुमच्या अभिप्रायाबाबत नक्कीच विचार केला जाईल.)

    Exit mobile version