‘आपण स्वत: नापास झाल्यापेक्षा आपला मित्र पहिला आल्याचे होते अधिक दुख: होतं.’ हा डायलॉग कॉलेजिअन्समध्ये लोकप्रिय आहे. मात्र इंटरनेटवर सध्या याच प्रकारे नेटक-यांनी सीबीएससी बोर्डात ९९.६ टक्के मिळवून पहिला आलेल्या सार्थक अग्रवालला टार्गेट केलं आहे. ‘सार्थक अग्रवाल मायमे’ नावाने पेजेस सुरु करण्यात आली आहेत.
‘सार्थक अग्रवाल ये बच्चा काल्पनिक है और इसका वास्तवसे कोई संबंध नही है’ असं काहीसं नेटकऱ्याचं म्हणणं आहे. म्हणजे एखाद्या विद्यार्थ्याला खरोखरच इतके मार्क्स मिळू शकतात यावर नेटकऱ्यांनी भरपूर कमेंटस केल्या आहेत. सार्थकच्या मार्कांवर चर्चा करताना चक्क २७ हजारांहून अधिक कमेंट करत नेटकऱ्यांनी भारतीय शिक्षणपद्धतीला चिमटे काढले आहेत. आणि यातूनच जन्माला आली आहेत अग्रवालवरील जोक्सची पेजेस.
कसा सुरु झाला हा ट्रेंड?
गेल्या आठवड्यामध्ये सीबीएसीचे निकाल लागले. दिल्लीतला सार्थक अग्रवाल हा विद्यार्थी ९९.६ टक्के मार्क मिळवत देशामध्ये अव्वल आला. इंग्रजी विषयामध्ये दोन मार्क गेल्याने सार्थकला ६०० पैकी ‘फक्त’ ५९८ मार्क मिळाले. सार्थकच्या या यशानंतर एका इंग्रजी वृत्तपत्राने आपल्या फेसबुक पेजवर सार्थकचा एक स्कॉलर असा फोटो पोस्ट केला. त्यानंतर सार्थकच्या मार्कांपासून फेसबुककरांनी कमेंट करायला सुरुवात केल्यानंतर ही पोस्ट व्हायर झाली. धम्माल कमेंटसमुळे या पोस्टचे स्क्रीन शॉट्स व्हॉट्सअॅपवरुनही फिरत होते. आजच्या क्षणाला या पोस्टला १ लाख ५१ हजार लाईक्स, १२ हजार शेअर आणि २७ हजार कमेंटस आहे. फेसबुकवर सार्थक अग्रवालवरील जोक्सची तीन फेसबुक पेजेस सुरु झाली आहेत.
काय आहे ‘सार्थक अग्रवाल मायमे’?
आपल्या मुलाला कितीही मार्क मिळाले तरी ते इतरांच्या मुलांपेक्षा कमीच असल्याची अनेक भारतीय पालकांची मानसिकता असते. त्यामुळे सार्थकलाही, ०.४ टक्के कुठे गेले असा खोचक प्रश्न विचारणारे जोक्स आणि पालकांच्या मानसिकतेवर टीका करणा-या पोस्ट या पेजेसवर केल्या जातात. तसंच सार्थकला इतके मार्क कसे काय मिळाले यामागील कारणे शोधणा-या अनेक मजेदार पोस्टला हजारोच्या संख्येने लाईक्स मिळत आहेत. ‘सार्थक अग्रवाल मायमे’ हे पेज मात्र लवकरच बंद होण्याची शक्यता आहे.
लोकप्रिय पेजेस
सार्थक अग्रवाल मायमे ९० हजार लाइक्स (दोन दिवसांमध्ये)
द बॉय हु स्कोअर्ड ९९.६% ५४ हजाराहून अधिक
या दोन पेजेसशिवाय लहान-मोठ्या पेजेसनाही हजारोंच्या घरात लाइक्स आहेत.
काही खास कमेंटस
कृपया अशा प्रकारच्या बातम्या देऊ नयेत. आमच्या घरी पालक आहेत.
९९.६ टक्के एवढी तर माझ्या फोनची बॅटरी पण चार्ज होत नाही.
माझ्या तीन वर्षांच्या ग्रॅज्युएशनपर्यंतच्या सर्व रिझल्टचीही इतकी टोटल नाहीय.
९९.६ टक्के? एवढे तर किटाणूही किटाणूनाशकाने मरत नाहीत.
मी स्वत: माझे पेपर तपासले असते तरी मला इतके मार्क मिळाले नसते.
हा मुलगा काल्पनिक असून याचा वास्तवाशी काहीही संबंध नाही.
या मार्कांची सीबीआय चौकशी झाली पाहिजे.
आठ वर्षांनंतर मला आज परत माझ्या दहावीच्या निकालासाठी बोलणे खावे लागणार
सार्थक बाळा, चांगल्या पेन्सिलीने लिहीले असते तर ते ०.४ टक्के पण मिळाले असते. कारण एक्स्ट्रा मार्क्स फॉर गुड हँडरायटिंग.
मला वाटते अशा प्रकारे अभ्यासावर राग काढणं चुकीचं आहे.
काही विशेष नाही, रजनीकांतनेच शिकवले असणार याला.
९९.६ टक्के आणण्यासाठी सार्थक लहानपणापासून १२वीचा अभ्यास करत होता.
९९.६%…लाईक किया जाए
दहावीचा निकाल लवकरच लागणार आहे. समजा, तुम्हाला यात जर ९९ टक्के मिळाले आणि त्याचं एखादं एफबी पेज वगैरे बनलं तर आश्चर्य वाटून घेऊ नका. सीबीएससी बोर्डाच्या एका मुलालाही असेच मार्क मिळाले आणि एफबीवर सुरू झाला एक खेळ. त्याच्या ९९.६%ची ही वेगळीच कहाणी खास तुमच्यासाठी…