फेसबुकवरही अॅड प्रेफरन्स

जगातील सर्वाधिक वापर असलेली सोशल नेटवर्किंग साइट फेसबुकची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढतेच आहे. अँड्रॉइड मोबाइलवर फेसबुक ‌आल्यामुळे तर त्याचा वापर प्रचंड वाढला आहे. या वापराबरोबरच त्याबरोबर झळकणाऱ्या विविध जाहिराती कधी त्रासदायक ठरतात. सर्वच सोशल साईट्सचा वापर करताना आपल्याला नको असलेल्या जाहिराती आपल्या पेजवर दिसत असतात. आपण आपल्या पीसीवरून ऑनलाइन जे प्रॉडक्टस् सर्च केलेले असतील, त्यातील बहुतांश जाहिराती आपल्याला आपल्या फेसबुक वॉलवर झळकताना दिसतात. मात्र, आता या जाहिराती आपल्याला टाळता येणार आहेत.

Facebook

यावर फेसबुकनेच मार्ग शोधला असून, ज्यांना अशा जाहिराती नको असतील, त्यांना त्या बंद करता येणार आहेत. ज्या जाहिराती आपल्याला पहायच्या असतील, अशाच जाहिराती आपल्याला पाहता येणार आहेत.


जेव्हा आपण कोणतीही वस्तू ऑनलाइन खरेदी करण्याचा विचार करतो, तेव्हा आपण विविध साइट्सवर जाऊन त्याचा शोध घेत असतो. यादरम्यान त्या शोधाशी संबंधित अनेक जाहिराती आपल्याला आपोआप दिसत असतात. या जाहिराती आपल्याला पहायच्या नसतील तर तुम्ही कम्प्युटरवर ब्राऊझर सेटिंग आणि मोबाइलवर आयओएस आणि अॅण्ड्राइड सेटिंगमध्ये जाऊन ती जाहिरात काढून टाकू शकता. या सुविधेला अॅड प्रेफरन्स म्हटले जाते. अशीच सुविधा फेसबुकही आपल्या युजर्ससाठी घेऊन येत आहे. याअंतर्गत आपण आपल्याला हवी असलेली कोणतीही जाहिरात पाहू शकाल आणि नको असलेली कोणतीही जाहिरात काढून टाकू शकाल किंवा ती जाहिरात तुमच्या फेसबुक पेजवर येण्यापासून रोखू शकाल.


फेसबुकने या सुविधेची अनाउन्समेंट केली आहे. अमेरिकेतील फेसबुक युजर्स येत्या काही दिवसांतच या सुविधेचा वापर करू शकणार आहेत. या विषयावर काम करीत असलेला समूह लवकरच ही सुविधा जगभरातील फेसबुक युजर्सपर्यंत पोहचविण्याच्या विचारात आहे. या सुविधेमुळे नको असलेल्या जाहिरातींना वैतागलेल्या युजर्सना दिलासा मिळणार आहे. ही सुविधा भारतात कधीपर्यंत पोहचते याची वाट आता फेसबुक युजर्स पाहत आहेत.

Exit mobile version