फेसबुकने नव्या न्यूज फीडमध्ये स्पॅमचा पर्याय खुला करून दिला आहे. तसेच यूजरपर्यंत त्याच्या उपयोगाच्याच स्टोरी अधिकाधिक पोहोचतील, अशी काळजी घेण्यात येत आहे. त्यासाठी यूजरने केलेले लाइक्स, वारंवार वापरलेले कंटेट यासारख्या गोष्टींचा उपयोग केला जाणार आहे. त्यामुळे हा फोटो लाइक करा, तुमच्यावर त्याची कृपा होईल वगैरे प्रकारच्या फीड दूर होतील, अशी फेसबुकला आशा आहे. मात्र यामुळे तुम्हाला एकच फीड वारंवार तुमच्या समोर येण्याचा धोका निर्माण झाला आहे.
वर्षभरापूर्वी न्यूजफीडच्या डिझाइनमध्ये खूप मोठा बदल करण्याचे सूतोवाच फेसबुकने केले होते आणि ते मोबाइल अॅपसारखे दिसेल, असे सांगण्यात आले होते. मात्र फेसबुकचे बहुतांश यूजर छोट्या स्क्रीन, कमी रिझोल्युशनचे कम्प्युटर वापरत असल्याने त्यांना नवीन डिझाइनचा फारसा उपयोग होणार नाही, असे फेसबुकच्या तांत्रिक टीमच्या लक्षात आले. त्यामुळे त्यांनी या फीडमध्ये फारसा मोठा बदल न करण्याचा निर्णय घेतला आहे. तरी देखील फेसबुकने केलेले हे बदल यूजरला तितकेसे रूचलेले नाहीत. नवीन डिझाइन अगदी त्रासदायक असल्याची तक्रार यूजर करत आहेत. काहींना हा लेआऊट गुगल प्लस सारखा वाटतो आहे.
इतके दिवस फेसबुक ट्विटरकडून विविध आयडिया घेत होते. आता ट्विटरने फेसबुकचे डिझाइन घेतले आहे. नव्या डिझाइनमध्ये आतापर्यंत सर्वाधिक पसंती मिळालेले ट्विट्स जरा मोठे दिसतील. त्यामुळे यूजरला ते शोधणे सोपे जाईल. काही ट्विट पिन करून ठेवण्याची सोयही यामध्ये आहे. तुमच्या प्रोफाइल पेजच्या वरच्या बाजूला हे ट्विट दिसतील. सोबतच ट्विट फिल्टर करण्याचाही ऑप्शन आता मिळणार आहे. इतरांची प्रोफाइल पाहताना ट्विट, ट्विट आणि फोटो किंवा ट्विट आणि त्यावरील रिप्लाय यामधून निवडण्याचा पर्याय यूजरला देण्यात आला आहे. नव्या प्रोफाइलमध्ये फोटोही मोठा दिसणार आहे.