‘फेसबुक’च्या अत्याधुनिक प्रयोगशाळेनेही या कामी स्वतःला वाहून घेतले आहे. ‘जगभरात इंटरनेटची व्याप्ती वाढावी, यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी आगामी काळात इंटरनेटचे वहन करण्यासाठी अवकाशाचाही वापर करण्याची आमची योजना आहे,’ अशी माहिती ‘फेसबुक’चा सहसंस्थापक आणि प्रमुख मार्क झुकेरबर्गने स्पष्ट केले. इंटरनेटच्या प्रसारासाठी ‘फेसबुक’तर्फे नवी प्रयोगशाळा उभारण्यात येणार असून, जगभरातील इंटरनेटचा प्रवास समजून घेण्यासाठी ‘इंटरनेट डॉट ओआरजी’ या वेबसाइटची निर्मितीही करण्यात येणार आहे.
सर्वत्र इंटरनेट पोहोचविण्याच्या मोहिमेसाठी जगभरातील नामवंत तंत्रज्ञांची मदत घेण्यात येणार आहे. त्यात ‘नासा’च्या ‘जेट प्रोपल्शन लॅब’ आणि ‘एम्स रिसर्च सेंटर’ या नामवंत प्रयोगशाळेतील तंत्रज्ञ आणि तज्ज्ञांचा समावेश आहे. यापूर्वी ‘गुगल’नेही वर्षभरापूर्वी ‘मिशन लून’ प्रकल्पाची घोषणा केली होती. रबराच्या बलूनच्या माध्यमातून जगभरातील दुर्गम ठिकाणी इंटरनेट पोहोचविण्याची ‘गुगल’ची योजना होती.