फेसबुकच्या मेसेंजर अॅपच्या अपडेटवर ही सुविधा उपलब्ध झाली आहे. त्यामुळे सध्या हे अॅप वापरणारे ते अपडेट करून किंवा नवे युझर अॅप डाऊनलोड करून या सुविधेचा लाभ घेऊ शकतील आणि फ्रेंडलिस्टमधील व्यक्तींना मोफत व्हीडिओ कॉल करू शकतील. मात्र त्यासाठी समोरच्या व्यक्तीच्या हँडसेटवरही ते अॅप असणे गरजेचे आहे. फेसबुकचे अॅप किंवा कम्प्युटरवर फेसबुक वापरणाऱ्यांना सध्या या सुविधेचा लाभ घेता येणार नाही. गेल्यावर्षी अमेरिका आणि कॅनडातील ग्राहकांना ही सुविधा देण्यात आली होती.
ही सुविधा फ्री असल्याचे सांगितले जात असले तरी ही पूर्ण मोफत नाही. त्यासाठी तुमच्या मोबाइलच्या इंटरनेट पॅकमधील डेटा वापरला जाणारच आहे. २ जी आणि ३ जी असे दोन्ही नेटवर्क वापरणाऱ्यांना या सुविधेचा लाभ घेता येईल. अर्थातच ३ जी आणि वायफाय वापरणाऱ्यांना ही सुविधा अधिक चांगल्या दर्जाची मिळेल. सध्या अँड्रॉइड आणि आयओएस अॅपसाठी ही सुविधा उपलब्ध आहे. आयओएस धारकांना याचे पुश नोटिफिकेशन येतील तर अँड्रॉइड धारकांना साधारण कॉलप्रमाणे अलर्ट केले जाईल. लवकरच ब्लॅकबेरी आणि विंडोज फोन धारकांनाही या सुविधेचा लाभ घेता येईल, अशी आशा आहे. मेसेंजर अॅप वरून फ्री व्हॉइस कॉल करण्यासाठी मेन्यू मध्ये जाऊन फ्री कॉलचा ऑप्शन निवडावा लागेल. त्यानंतर फ्रेंडलिस्टमधून निवडून तुम्ही संबंधित व्यक्तीला कॉल करू शकतात. आयफोनसाठी ही प्रक्रीया थोडी क्लिष्ट आहे. त्यांना ज्या व्यक्तीला कॉल करायचा आहे त्याच्यासोबतचे चॅट ओपन करावे लागेल. त्यानंतर मेन्यूमध्ये जाऊन उजव्या हाताला वर असलेला कॉल हा ऑप्शन क्लिक करावा लागेल.
फेसबुकने अधिग्रहण केल्यावर व्हॉट्स सुद्धा जुलैपर्यंत व्हॉइस कॉल सुविधा देणार आहे. त्यातच फेसबुक मेसेंजर अॅपच्या तुलनेत व्हॉट्स अॅपची लोकप्रियता खूप मोठी आहे. त्यामुळे या सुविधेला किती युझर पाठिंबा मिळते हे उत्सुकतेचे ठरणार आहे.
मटा सजेशन
मोबाइलवर व्हीडिओ पाहण्यासाठी Vuclip हे अॅप वापरता येते. नुकतेच या अॅपचे अपडेट देण्यात आले आहे. त्यातून २४x७ व्हीडिओ, ऑफलाइन व्हीडिओ पाहण्याचा पर्याय, सोशल मीडियावर शेअर करण्याची संधी अशा विविध सुविधा यात देण्यात आल्या आहेत.