हे पण अँड्रॉइडवर चालते…

मोबाइलमुळे अँड्रॉइड ही ऑपरेटिंग सिस्टीम गावोगावी पोहोचली. पण यामुळे अँड्रॉइड केवळ मोबाइल, टॅबसाठीच वापरली जाते असा एक समज निर्माण झाला आहे. त्याला धक्का देणारी ही काही अँड्रॉइडवर चालणारी उपकरणे 

ओव्हन 

नुकत्यात झालेल्या कन्झुमर इलेक्ट्रॉनिक्स शोमध्ये डकोर या कंपनीने अँड्रॉइड आइस्क्रीम सँडविचवर चालणारा ओव्हन सादर केला. ७ इंची टचस्क्रीन असलेल्या या ओव्हनमध्ये मोबाइलसाठी असलेली सर्व अॅप्स वापरता येतात. यामध्ये विविध रेसिपी वाचणे, त्यांचे व्हीडिओ पाहणे यासारखी कामे जेवण तयार करताना करता तर येताच पण जेवण तयार झाले का हे देखील ओव्हन सांगतो. 

वॉशिंग मशिन 

सॅमसंगने गेल्यावर्षी अँड्रॉइडवर चालणारे वॉशिंग मशिन सादर केले आहे. फ्रंट लोडिंगची सुविधा असलेले १२ किलो क्षमतेच्या या वॉशिंग मशिनला टचस्क्रीन आहे. या मशिनच्या अॅपच्या आधारे मोबाइल किंवा टॅबवरून वायफायद्वारे संपूर्ण मशीन हाताळता येते. एलजी आणि पॅनासोनिकही अशा वॉशिंगमशिनवर काम करत आहेत. 

कॅमेरा 

कॅनॉन आणि सॅमसंगने अँड्रॉइडवर चालणारा कॅमेरा सादर केला आहे. यात सर्वप्रकारची अँड्रॉइड अॅप्स वापरता येतात आणि वायफाय किंवा ३ जी द्वारे इंटरनेट अॅक्सेस करता येते. यात इन्स्ट्राग्राम, पेपर कॅमेरा यासारखी अॅप वापरून फोटो एडिट करता येतात आणि सोशल नेटवर्किंग साइट्वर शेअर करता येतात. 

टीव्ही 

इंटरनेट असणाऱ्या टीव्हीची लाट मोठी होण्यापूर्वीच ओसरली असून त्याची जागा आता अँड्रॉइड आधारित टीव्हीने घेतली आहे. या टीव्हीला युएसबीच्या आधारे की-बोर्ड, माऊस जोडून फेसबुक, ट्विटर आणि जीटॉक, इमेल, स्काइप अॅक्सेस करता येते. यावरून सर्व अॅप्स वापरता येत असल्याने अगदी अँग्री बर्ड आणि इतर गेमही खेळता येतात. लिनोव्हो, टीसीएल, सोनी यासारख्या कंपन्यांनी हे टीव्ही बाजारात आणले आहेत. 

सेट टॉप बॉक्स 

टीव्हीपाठोपाठ अँड्रॉइड आधारित सेट टॉप बॉक्सही बाजारात आले आहेत. एचडीएमआय केबलच्या आधारे हे सेट टॉप बॉक्स टीव्हीला जोडता येतात. वायफाय आणि इथरनेटच्या आधारे यावर इंटरनेट वापरता येते. काही बॉक्ससोबत देण्यात येणाऱ्या रिमोटच्या आधारे गेमही खेळता येतात. आइस्क्रीम सँडविचवर आधारित हे सेट टॉप बॉक्स अॅमकिट, पोट्रॉनिक्स, किकस्ट्रार्टर यासारख्या कंपन्यांनी सादर केले आहेत. 

Exit mobile version