गेल्या वर्षभरात ‘व्हॉट्स अॅप’ची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत चाललेली असताना, सोशल नेटवर्किंग साइट जगतावर अधिराज्य गाजवणा-या फेसबुकला उतरती कळा लागल्याचं चित्र दिसत होतं. त्यामुळे फेसबुकनं वेळीच हातपाय न हलवल्यास त्यांचीही गत ‘ऑर्कुट‘सारखीच होईल, असा सल्ला मार्क झुकरबर्गला हितचिंतकांनी दिला होता. त्याचा गांभीर्यानं विचार करून, ‘किसी भी किमत पर’ व्हॉट्स अॅप’ खरेदी करण्याचा चंगच मार्कनं बांधला होता. त्यामुळे फेसबुक-व्हॉट्स अॅपमधील या व्यवहाराकडे तंत्रज्ञानविश्वाचं लक्ष लागलं होतं. हे डील अखेर निश्चित झालं असून, तब्बल १९ अब्ज डॉलर्स मोजून फेसबुकनं व्हॉट्स अॅपची मालकी मिळवली आहे. तंत्रज्ञान जगतातील हे आजवरचं सगळ्यात मोठं अधिग्रहण ठरलंय.
४ अब्ज डॉलर रुपये, १२ अब्ज डॉलरचे शेअर आणि व्हॉट्स अॅपच्या संस्थापक, कर्मचा-यांना ३ अब्ज डॉलर देऊन फेसबुकनं हा व्यवहार केला आहे. त्याचप्रमाणे व्हॉट्स अॅपचे सहसंस्थापक आणि सीईओ जॅन कोयूम यांना फेसबुकच्या संचालक मंडळात स्थान देण्यात आलं आहे.
येत्या काळात जगभरातील १ अब्ज लोक व्हॉट्स अॅपशी जोडले जाणार आहेत. हा टप्पा म्हणजे मैलाचा दगडच आहे. त्यामुळे जॅन आणि त्याच्या कंपनीसोबत जोडलं जाणं ही आमच्यासाठी नक्कीच आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे, अशी भावना मार्क झुकरबर्गनं व्यक्त केली आहे. अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचण्याचं, त्यांना जवळ आणण्याचं मिशन या अधिग्रहणामुळे शक्य होईल. तसंच, परवडणा-या दरात सर्वोत्तम सेवा देण्याचं उद्दिष्टही त्यातून साधता येणार आहे, असं संयुक्त पत्रकात नमूद करण्यात आलंय.
व्हॉट्स अॅपची मालकी फेसबुककडे गेली असली, तरी हे अॅप स्वायत्तपणे कार्यरत असेल, असं जॅन कोयूम यांनी स्पष्ट केलं आहे. आजच्यासारखेच अगदी किरकोळ पैसे मोजून स्मार्टफोनधारकांना जगभरात कुठूनही व्हॉट्स अॅपचा पुरेपूर आनंद लुटता येईल. या संवादात जाहिरातींचा अडथळा नसेल, असं त्यांनी अगदी खात्रीपूर्वक सांगितलं.
दरम्यान, २०१२ मध्ये फेसबुकनं १ अब्ज डॉलर्सना ‘इन्स्टाग्राम’ खरेदी केलं होतं. परंतु, त्याचा ना फेसबुकला फायदा झाला, ना इन्स्टाग्रामला. उलट, इन्स्टाग्राम काळाच्या ओघात वाहूनच गेलं. आता तसाच प्रकार व्हॉट्स अॅपबाबत होऊ नये, असं फेसबुक, व्हॉट्स अॅप आणि व्हॉट्स अॅपप्रेमींनाही मनापासून वाटतंय. आता बघुया, पुढे काय-काय होतं ते!