
जगातला सर्वाधिक मोठा एनसायक्लोपिडिया अर्थातच विकिपीडियावर आपल्याविषयी चांगलं लिहिलेलं असावं असं कुणालाही वाटणारच. पण त्यासाठी पैसे मोजण्याचीही अनेकांची तयारी आहे. बिझनेसमन, सेलिब्रेटी, राजकारणी यांच्यापासून ते कुठल्याशा गॅरेजच्या मालकालाही विकिपीडियावर आपलं कौतुक झालेलं हवं आहे. यातून फ्रिलान्स रायटर्स आणि सोशय मीडिया मार्केटिंग एजन्सीनं ‘पेड रायटिंग’या प्रकरणाला खतपाणी घातलं आहे.
डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीला ईए बार्बरनं ‘विकिपीडियावरचं पेड एडिटिंग’ यावर संशोधन केलं. यातून त्यानं असा निष्कर्ष काढला, की एका विकिएडिटरनं दिल्लीतल्या नामांकित बिझनेस स्कूलच्या माहितीत फेरफार केला. त्या महाशयांवर सतत दोन वर्षांसाठी संस्थेबाबतची नकारात्मक माहिती वगळल्याचा ठपकाही ठेवण्यात आला. ‘इंडियन फेकर्स टीच विकी पीआर’या ब्लॉगमध्ये संशोधकानं, विकीच्या संपादकानं त्याला माहीत असलेल्या पॉलिसींचा आपल्या आधिकारात कसा गैरवापर केला, याचं सविस्तर वर्णनही दिलं. या प्रकरणानंतर विकिच्या संपादकांनं आपली बाजू मांडत असं काही झालं नसल्याचा निर्वाळाही दिला.
‘ऑनलाइन रेप्युटेशन मॅनेजमेंट’या नावाखाली अनेक सोशल मीडिया एजन्सी विकिच्या विनंतीनुसार काम करत असल्याचं सांगतात. ज्याचं पॅकेज ५० हजारांपासून ते तीन-पाच लाख रुपयांपर्यंत आहे. विकिच्या संपादकांना अनेकदा तिथला मजकूर बदलणं, नव्यानं अॅड करणं किंवा तत्सम प्रकारांसाठी ‘मॅनेज’ करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचीही चर्चा आहे. त्यासाठीची विनंती फेसबुक-ट्विटरवर केली जाते.
पेड एडिटिंग केल्याबद्दल विकिमीडिया फाउंडेशन जे विकिपीडिया चालवतं, त्यांनी एका कर्मचाऱ्याला कामावरून कमी केल्याचंही ताजं उदाहरण आहे. विकिपीडियावरची आर्टिकल्स आणि माहिती एडिट करण्यासाठी फेक अकाउंटचा वापर केला जात असल्याचंही निदर्शनास आलं आहे. या प्रकाराबाबत विकिमीडियाचे प्रवक्ते जय वाल्श सांगतात, की तिथल्या मजकुरात बदल करणं हे एडिटिंग कम्युनिटीच्या कार्यकर्त्यांचं कामच आहे. तसंच, विशिष्ट माहिती विकिपीडियावर आहे, तर त्याचा अर्थ हे ‘वर्क इन प्रोग्रेस’आहे, असा होतो.
सोशल नेटवर्किंग साइटवर एखादी पोस्ट टाकली, की त्याला किती लाइक वा हिट्स मिळतात, याचं कुतूहल प्रत्येकालाच असतं. अनेकदा आपल्या पोस्टला लाइक्स मिळावेत यासाठी आपण धडाधड दुसऱ्यांचे फोटो आणि पोस्ट लाइक करत सुटतो. ही एक प्रवृत्ती आहे. त्यासाठी आता पैसेही मोजण्याचा ट्रेंड रुजत असेल, तर नवल वाटू नये.
सारं काही लाइक्ससाठी
सर्वसामान्य माणूस लाइक्ससाठी पैसे मोजत नसला, तरी तो त्याच्या परीनं काही ना काही क्लृप्त्या करतच असतो. आपल्या फ्रेंडलिस्टमधील प्रत्येकाच्या प्रत्येक पोस्टला, फोटोला लाइक करणं ही त्यातली सर्वसामान्यपणे वापरली जाणारी क्लृप्ती. अर्थात, यातून आपण काय मिळतो आणि लाइक्स मिळवण्यासाठी किती वेळ खर्च करतो, याचा हिशेब कोणी ठेवत नाही, ही गोष्ट वेगळी.