टेकफेस्टच्या तिसऱ्या आणि शेवटच्या दिवशी झालेल्या व्याख्यानात नारायणन यांनी सुरुवातीपासूनचा फोटोशॉपचा प्रवास मांडला. फोटोशॉपच्या एका आवृत्तीपासून दुसऱ्या आवृत्तीच्या दरम्यान सुमारे १८ महिन्यांचा कालावधी मिळतो. त्यात शक्य त्या सर्व गोष्टी देण्याचा आमचा प्रयत्न असतो. वापरात येणाऱ्या समस्यांमुळे नवनवीन फीचर्स अॅड करण्याची प्रेरणा मिळते. सुरुवातीच्या काळात फोटोशॉपवर काम केल्यावर ते कलर सीएमवायके प्रिंटिंगमध्ये कसे दिसतात हे पाहण्यासाठी लगेच लोक प्रिंटरवर काम करत. त्यामुळेच आम्ही सीएमवायके कलर पॅलेट अॅड केल्याचे त्यांनी सांगितले.
* … विंडोजला सपोर्ट न करण्याचे ठरविले होते
सुरुवातीच्या काळात मॅकमध्ये मिळणाऱ्या विविध अत्याधुनिक सुविधांमुळे विंडोजपेक्षा कितीतरी चांगले फोटोशॉप त्यावर देता येत होते. त्यावेळी विंडोजसाठी फोटोशॉप डेव्हलप करणे आमच्यासाठी प्रचंड मनस्ताप देणारे काम होते. त्यामुळे एका क्षणी यापुढे विंडोजला सपोर्ट करणारे फोटोशॉप तयारच करायचे नाही , या निर्णयापर्यंत आम्ही आलो होतो. पण अचानक विंडोज एनटी आले आणि आमचे काम सोपे झाल्याची आठवण त्यांनी सांगितली.