‘ यूटोपिया मोबाइल ‘ ने यापूर्वी ‘ फेसबुक ‘ शीही अशाच प्रकारचा करार केला होता. ‘ यूटोपिया ‘ चे सहसंस्थापक आणि सीईओ सुमेश मेनन यांनी दिलेल्या माहितीनुसार ‘ट्विटर ‘ ची ही सेवा पुढील वर्षीच्या पहिल्या तिमाहीत सुरू होईल. साध्या मोबाइलवर एक कोड नंबर डायल करून यूजरना या सेवेचा लाभ घेता येईल. सध्या जगभरातील १.१० कोटी यूजर ‘ यूटोपिया ‘ च्या ‘फोनट्विश सेवे ‘ च्या माध्यमातून ‘ डेटा कनेक्शन ‘शिवाय ‘ फेसबुक ‘ आणि ‘ गुगल टॉक ‘ सेवेचा आनंद घेत आहेत, असेही मेनन यांनी नमूद केले.
‘ अनस्ट्रक्चर्ड सप्लिमेंटरी सर्व्हिस डेटा ‘ अर्थात ‘ यूएसएसडी ‘ नामक टेलिकॉम प्रोटोकॉलच्या माध्यमातून ‘यूटोपिया ‘ तर्फे ही सेवा सामान्य मोबाइलमधारकांना प्रदान करण्यात येणार आहे. ‘ यूएसएसडी ‘ चा अंतर्भावर असणाऱ्या साध्या मोबाइलधारकांना ‘ ट्विटर ‘ चा वापर करता येईल. पण, त्यांना होमपेजवरील छायाचित्रे, व्हिडिओ आणि अन्य प्रकारची ग्राफिक्स पाहता येणार नसल्याचेही मेनन म्हणाले.
विकसनशील राष्ट्रांमधील प्रत्येकी दहा मोबाइलधारकांमध्ये ८ मोबाइलधारक पॉकेट डेटा वापरत नाहीत. त्यामुळे अशा मोबाइलधारकांना विना इंटरनेट सोशल नेटवर्किंगचा आनंद घेता येण्यासाठी ‘ यूटोपिया ‘ प्रयत्नशील असल्याचेही मेनन म्हणाले. जगभरात सोशल नेटवर्किंगच्या संपर्कात राहणाऱ्यांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. विशेषतः विकसनशील राष्ट्रांमध्ये हे प्रमाण अधिक आहे. या राष्ट्रांमधील तरुणवर्ग डोळ्यासमोर ठेवून अशाप्रकारच्या सुविधा देण्याकडे कंपनीचा कल असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. आशिया, आफ्रिका आणि दक्षिण अमेरिका आदी खंडांमधील तरुणाईचा सोशल नेटवर्किंगकडे कल अधिक असल्याचेही ते म्हणाले.