दिवाळीनिमित्त इंटरनेट ग्राहकांना खुशखबर देण्यासाठी वोडाफोन इंडियाने डाटा दरांत चक्क 80 टक्क्यांनी कपात करण्याची घोषणा केली आहे. उद्यापासून (शुक्रवार) नवीन दर लागू केले जाणार आहेत.
जून महिन्यापासून वोडाफोन कंपनीने डाटा दरांत 10 पैसा प्रति 10 केबीपासून 2 पैसे प्रति 10 केबी अशी कपात केली होती. परंतु, ही कपात केवळ कर्नाटक, पश्चिम उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड सर्कलसाठी लागू करण्यात आली होती. आता याची व्याप्ती वाढविण्यात आली असून संपूर्ण भारतासाठी ही योजना लागू करण्यात आली आहे.
यासंदर्भात कंपनीने सांगितले आहे, की चार राज्यांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर ही योजना लागू करण्यात आली होती. तिला अपेक्षित यश मिळाल्याने आता संपूर्ण भारतात ही योजना लागू केली जाणार आहे. पे-एस-यू-गो बेसीसवर प्रिपेड आणि पोस्टपेड 2G ग्राहकांना 1 नोव्हेंबरपासून ही योजना लागू केली जाणार आहे. ग्राहक रोमिंगमध्ये असला तरी हाच दर लागू केला जाणार आहे.
वोडाफोनने सांगितले आहे, की पे-एस-यू-गो दर 2G, 3G सेवेसाठी सारखेच आहेत. सध्या मोबाईल सेवा पुरविणाऱ्या कंपन्यांच्या तुलनेत हे सर्वांत कमी दर आहेत. लोकांना इंटरनेट साक्षर करण्यासाठी ही योजना बाजारपेठेत आणली आहे.वोडाफोनने डाटा दरांत कपात केल्याने आता इतरही मोबाईल सेवा पुरविणाऱ्या कंपन्या दरांत कपात करतील, अशी शक्यता वर्तविण्यात आली आहे