सध्या गुगलने कला, संगीत, कम्प्युटर, इलेक्ट्रॉनिक्स, शिक्षण, करिअर, फॅशन, सौंदर्य, फिटनेस, आहार, आरोग्य, घरे आणि बगीचे यांसारख्या विषयांवर मदतीसाठी ही सुविधा सुरू केली आहे. या सुविधेचा लाभ घेण्यासाठी युजर्सना त्यांच्या गरजेच्या क्षेत्रातील तज्ज्ञांशी व्हिडीओ चॅटिंग करता येईल. यासाठी उपलब्ध तज्ज्ञांचे शिक्षण, अनुभव, त्यांना मिळालेले रेटिंग आणि त्यांच्या सेवेबाबत इतरांनी दिलेले रेटिंग यांचा आधार घेता येईल. त्यासाठी संबंधित तज्ज्ञांशी लगेच कनेक्ट होता येईल किंवा आगाऊ अपॉइंटमेंट घेऊन ठेवता येईल.
गुगलने सुरू केलेली ही सुविधा सशुल्क आहे. त्यासाठी प्रति मिनिट किंवा प्रति हेल्पआऊट पैसे मोजावे लागणार आहेत. हे पैसे गुगल वॉलेटच्या आधारे द्यावयाचे आहेत. यातील २० टक्के पैसे गुगलच्या खात्यात जमा होणार आहेत. काही सुविधांसाठी मोफत सल्लादेखील मिळणार आहे. यासाठी तज्ज्ञांची निवड करताना, प्रामुख्याने आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांची निवड करताना त्यांच्या पार्श्वभूमीची काटेकोर तपासणी करण्यात आल्याचा कंपनीचा दावा आहे. हेल्पआऊटचा लाभ घेत असताना युजर्स ते इतरांशी शेअर करू शकतात, एडिट करू शकतात किंवा रेकॉर्ड करूनही ठेवू शकतात. तसेच एखाद्या हेल्पआऊटमुळे पूर्ण समाधान झाले नाही, तर पूर्ण पैसे परत देण्याची खात्रीही गुगल देत आहे. सध्या हजाराहून अधिक ब्रँडनी यासाठी गुगलशी टाय-अप केले आहे. येत्या काही काळात ही संख्या आणखी वाढेल, अशी कंपनीला अपेक्षा आहे.
मात्र आजही ओळखीच्या व्यक्तींशिवाय अन्य कोणाचा सल्ला घ्यावयाचा असेल, तर यू-ट्युब हाऊ टू, याहू आन्सर, फेसबुक किंवा ट्विटर या माध्यमातून विचारलेल्या एखाद्या प्रश्नाला मोफत उत्तर मिळते. त्यामुळे गुगलच्या मोफत सेवेची सवय झालेले किती जण या सेवेचा लाभ घेतात, हे येत्या काळात कळेलच. पण जगभरातील तज्ज्ञांकडून थेट मार्गदर्शन मिळणार असेल तर पैसे मोजायलाही काही जण होतील, ही शक्यताही आहेच.