हाताने लिहा आणि जीमेल करा

ईमेल पाठविण्यासाठी अनेक पर्याय हल्ली उपलब्ध झालेत. वाढलेल्या स्पर्धेमुळे मग वेगवेगळ्या थीम्स, मोठी स्टोरेज स्पेस अशा विविध सोयी देऊन कंपन्यांनी युझर्सना आकर्षित करण्याचे प्रयत्न सुरू ठेवले आहेत. मात्र प्रत्येक वेळा ईमेल पाठवताना तो ‘टाइप’ करावा लागतो. मात्र आता गुगलने ईमेल ‘लिहून’ पाठविण्याची सुविधा फारसा गाजावाजा न करता सुरू केली आहे. 


                          वेगवेगळ्या भाषांमध्ये ईमेल करण्याची सोय गुगलने काही वर्षांपूर्वीच सुरू केली आहे. त्यासाठी जीमेलच्या स्क्रीनवर उजव्या हाताला असलेल्या सेटिंग्ज बटनावर क्लिक करून जनरल टॅबमध्ये ‘ एनेबल इनपुट टूल्स ‘ वर क्लिक केल्यावर येणाऱ्या यादीतील शेकडो भाषांमध्ये हव्या त्या भाषा सिलेक्ट करा. त्या भाषेत तुम्ही मेल करू शकता. त्यामध्ये ऊर्दूपासून मराठी, हिंदी, संस्कृत, गुजराती, पंजाबी यासारख्या वेगवेगळ्या भाषा आहेत. आतापर्यंत या भाषांमध्ये ईमेल पाठविण्यासाठी तो त्या भाषेत ‘टाइप’ करावा लागत होता. 

                    पण आता ती गरजही संपली आहे. गुगलने ठराविक भाषांमध्ये मेल लिहून पाठविण्याची सोय उपलब्ध करून दिली आहे. त्यासाठी ‘ एनेबल इनपुट टूल्स ‘ वर क्लिक केल्यावर येणाऱ्या भाषांच्या यादीमध्ये काही भाषांसमोर केवळ की-बोर्डचे चिन्ह येते, तर काहींसमोर की-बोर्ड आणि पेन्सिल अशी दोन्ही चिन्हे असतात. की-बोर्ड असलेला ऑप्शन अॅड केला तर संबंधित भाषेत टाइप करता येते आणि पेन्सिल असलेला ऑप्शन निवडला तर त्या भाषेत लिहिता येते. सध्या यामध्ये इंग्रजी, देवनागरी (हिंदी), फ्रेंच, इटालियन, रोमन, रशियन, थाई यासारख्या काही भाषांचा पर्याय उपलब्ध आहे. 


इमेल लिहीण्यासाठी नेहमीप्रमाणे ‘ कम्पोझ ‘ वर क्लिक केल्यावर जीमेलच्या स्क्रीनवर उजव्या बाजूला सेटिंग्जच्या बाजूला असणाऱ्या इनपुट टूल्सच्या टॅबमध्ये तुम्ही अॅड केलेल्या सर्व भाषा दिसतील. उदा. हिंदीमध्ये लिहीण्यासाठी तुम्ही पेन्सिल असलेला ऑप्शन निवडला आहे तर इमेल करण्यापूर्वी इनपुट टूल्समधून तो सिलेक्ट करा. त्यानंतर एक नोटीस बोर्ड ओपन होईल. त्यावर माऊसच्या सहाय्याने तुम्हाला हवा तो शब्द ‘लिहा’. त्या शब्दाचे पर्याय खाली दिसतील. त्यातून अपेक्षित शब्द निवडून अॅड केला की तो इमेलमध्ये अॅड होईल. त्यापूर्वी तो शब्द कुठे तुम्हाला अॅड करायचा 
उदा. इमेलचा सब्जेक्ट किंवा बॉडी ते सिलेक्ट करा. अशा प्रकारे तुम्हाला हवे ते शब्द लिहून मेलमध्ये अॅड करून नेहमीप्रमाणे ईमेल पाठवू शकता. गुगल डॉकमध्येही ही सुविधा उपलब्ध आहे.
gmail-enables-touch-input

ADVERTISEMENT
Exit mobile version