‘FB’ ऐकत नाही, म्हणून झुकेरबर्गचंच अकाउण्ट हॅक

Mark Zuckerberg's account hackedकुणी आपल्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केलं तर आपण चिडतो आणि त्याचं लक्ष वेधून घेता येईल अशी युक्ती वापरतो. अगदी तसंच झालयं फेसबूकचं. फेसबूकवरील सिक्युरीटी संदर्भात एका युझरनं अनेकदा कंपनीला कळवलं. पण कंपनीने त्याचा प्रश्न धुडकावून लावला. अखेर संतापलेल्या ‘त्यानं’ चक्क मार्क झुकेरबर्गच अकाउण्ट हॅक केलं.


फिलिपाइन्स मधल्या खालिल नामक फेसबूक युझर्सने हा कारनामा केला असून कोणत्याही वाईट कामासाठी मी अकाऊण्ट हॅक केलेले नाही, असे त्याने स्पष्ट केले आहे. फेसबूकने माझे म्हणणं ऐकलं नाही म्हणून मला हा पर्याय निवडावा लागत असल्याचे खालिलने म्हटले आहे. फेसबूकवर सर्फिंग करताना खालिला फेसबूकमध्ये असा ‘बग’ सापडला ज्याद्वारे कुणीही कुणाच्याही ​अकाउण्टमधून दुस-याच्या फेसबूक वॉलवर पोस्ट करु शकतं. याबद्दल खालिलने अनेकदा फेसबूकला मेल आणि मेसेज पाठवून माहिती दिली. मात्र त्यावर काहीच उत्तरही आले नाही आणि तो बगही काढण्यात आला नव्हता. त्यामुळे खालिलने थेट फेसबूकचा संस्थापक मार्क झुकेरबर्गचे अकाऊण्ट हॅक करुन त्याच्याच वॉलवरुन ही माहिती पोस्ट करुन फेसबूकला हादरा दिला.


‘माझे नाव खलिल असून माझ्याकडे माहिती तंत्रज्ञानची बीए डिग्री आहे. मला फेसबूकवर एक बग सापडला असून त्या बगच्या मदतीने फेसबूक यूझर्स दुस-या कोणत्याही यूझरच्या वॉलवरुन लिंक शेअर करु शकतो. मी याची चाचणीही करुन पाहिली आहे. त्यात मला यशही आहे. त्यामुळे कृपया तुम्ही या प्रकरणात लक्ष घालावे, अशी माझी विनंती आहे’, असा संदेश खालिलने काही दिवसांपूर्वी फेसबूकच्या सुरक्षा विभागाला पाठवला होता.


मात्र अशाप्रकाराचे एक दोन संदेश पाठवल्यानंतर फेसबूकने आपल्या सुरक्षेमधील एवढी मोठी चूक मान्य करण्याऐवजी खालिला ही साइटवरील चूक नसल्याचे उत्तर दिले. तसेच फेसबूकच्या प्रोग्रामिंगमधील चुका दाखवून देणा-यांना देण्यात येणारे बक्षिसही खालिला देण्यात आले नाही. मात्र या सर्वांमुळे निराश न होता खालिलने थेट मार्क झुकेरबर्गचंच अकाऊण्ट पेज हॅक करुन मार्कच्या वॉलवर स्वत:च्या नावाने पोस्ट टाकली. यामुळे कंपनीला एक साधीशी वाटणारी चूक किती मोठी आहे याची जाणीव झाली. या पोस्टनंतर मात्र फेसबूकमधील सुरक्षा विभागाने थेट खालिला फोन केला आणि त्याने हे कसं केलं यासंदर्भात संपूर्ण चौकशी केली. अखेर ती चूक सुधारण्यात आली.


काय पोस्ट केल होत खालिलने मार्कच्या फेसबूक वॉलवर?
‘तुमचे अकाऊण्ट हॅक करण्यासाठी आणि प्रायव्हसीचे उल्लंघन करण्यासाठी मला माफ करा मात्र माझ्याकडे तुमच्या साइटवरील चूक लक्षात आणून देण्यासाठी अन्य पर्याय नव्हता.’


इतकी मोठी क शोधूनही खालिला बक्षिस का नाही?


सामान्यपणे फेसबूकमधील प्रोग्रॅमिंगची चूक शोधून काढणा-यांना फेसबूक घसघशीत रक्कम बक्षिस म्हणून देतं. मात्र खालिला हे बक्षिस देण्यात आलं नाही. याबद्दलचे स्पष्टीकरण देताना फेसबूक सुरक्षा विभागाच्या जोन्स यांनी हॅकर्स जेव्हा दुस-याच्या प्रायव्हसीचे उल्लंघन करीत नाही तेव्हाच त्याला बक्षिस देण्याचा कंपनीचा नियम असल्याचे सांगितले. खालिलने हा बग शोधण्यासाठी त्याच्या चाचणीसाठी त्याच्या दोन मित्रांच्या आणि मार्क झुकेरबर्गच्या अकाऊण्ट प्रायव्हसीचा भंग केला आहे. त्यामुळे नियमांनुसार त्याला बक्षिस देण्यात येणार नसल्याची माहिती जोन्स यांनी दिली. मात्र यापुढे नियमांमध्ये राहून खालिलने पुन्हा असा बग शोधून काढल्यास फेसबूक नक्कीच त्याला बक्षिस देईल, असा विश्वासही जोन्स यांनी व्यक्त केला.

ADVERTISEMENT
Exit mobile version