फेसबुक वेबसाइट अधिक सुरक्षित आणि प्रभावी व्हावी या उद्देशाने फेसबुकने ‘ बग दाखवा आणि इनाम जिंका ‘ असे आवाहन केले होते. यानंतर जगभरातील फेसबुक युजरनी त्यांना साइटवर आढळणाऱ्या ‘ बग्ज ‘ ची माहिती आणि त्यावर उपाय सुचवण्यास सुरुवात केली. यात सर्वाधिक सजेशन्स हे भारतातून आले तर इनाम जिंकणाऱ्यांच्या यादीत भारत दुसऱ्या स्थानावर असल्याचे फेसबुकने त्यांच्या ऑफिशिअल पेजवर म्हटले आहे.
फेसबुकचा वापर करताना येणारे सॉफ्टवेअर किंवा हार्डवेअरमधील अडचणी याचबरोबर प्रोग्राममध्ये आढळणारे एरर तसेच त्यावरचा उपाय फेसबुकला कळवावे, असे आवाहन फेसबुकने दोन वर्षांपूर्वी केले होते. यातील जे एरर आणि त्यांचे सोल्युशन योग्य असेल याचा विचार करून फेसबुकची सिक्युरिटी टीम त्यानुसार साइटमध्ये सुधारणा करत होती. यामुळे दोन वर्षांत साइटमधील बहुतांश एरर समोर आले आणि त्यात सुधारणा होऊन वेबसाइट अधिक प्रभावी झाली, असा दावा फेसबुकने केला आहे. या बगमुळे सॉफ्टवेअर क्रश होणे, वेबसाइट खराब होणे, वेबसाइटला अनधिकृत अॅक्सेस मिळवणे अशाप्रकारच्या घटना सातत्याने घडत होत्या. यामुळे फेसबुकने हा उपक्रम सुरू केला होता. या उपक्रमाला अपेक्षेपेक्षा खूप चांगला प्रतिसाद मिळाला आणि वेबसाइट अधिक सुरक्षित होण्यास यामुळे मदत झाली, असा दावा फेसबुकच्या पेजवर करण्यात आला आहे.
या उपक्रमामध्ये दहा लाख अमेरिकन डॉलरची बक्षिसे देण्यात आली असून, हा पैसा आमच्या सुरक्षा रिसर्चसाठी गुंतविण्यात आल्याचे आम्ही समजतो, असेही फेसबुकने स्पष्ट केले. सूचना करण्यात आलेल्या एकूण लाखभर युजरपैकी ३२९ जणांना बक्षिसे देण्यात आली असून यामध्ये व्यावसायिक संशोधक, विद्यार्थी, तरूण यांचा सहभाग होता. एक विशेष बाब म्हणजे १३ वर्षीय एका मुलानेही यामध्ये बक्षिस मिळविले आहे. सर्वाधिक ‘ बग ‘ ची माहिती देणाऱ्या देशांचा क्रम अमेरिका, भारत, ब्रिटन, तुर्कस्थान, आणि जर्मनी असा लागतो. या उपक्रमात ५१ देशांमधील युजरनी ‘ बग ‘ ची माहिती कळविली होती. बक्षिस मिळवलेल्या दोन जणांना फेसबुकच्या सिक्युरिटी टीममध्ये नोकरी देण्यात आल्याचे फेसबुकचे सिक्युरिटी इंजिनीअर कोलिन ग्रीन यांनी स्पष्ट केले.