गुगलचं चॅलेंज तुम्ही स्वीकारणार?

googleभारताच्या स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर गुगलने एक उपक्रम हाती घेतला आहे. ‘ गुगल इम्पॅक्ट चॅलेंज इन इंडिया ‘असे त्या उपक्रमाचे नाव असून , ना नफा तत्त्वावर कार्यरत असलेल्या संस्थांना नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी तंत्रज्ञान वापराची कल्पना त्याअंतर्गत मांडायची आहे. उत्तम कल्पना मांडणाऱ्या चार संस्थांना त्यांच्या कल्पनेतील प्रकल्प प्रत्यक्षात आणण्यासाठी प्रत्येकी सुमारे तीन कोटी रुपयांचे पारितोषिक आणि ‘ गुगल ‘ कडून तांत्रिक साह्य मिळणार आहे. ‘ गुगल ‘ कडून नुकतीच या प्रकल्पाची घोषणा करण्यात आली. 



‘ गुगल ‘ चे वरिष्ठ उपाध्यक्ष आणि मुख्य व्यवसाय अधिकारी निकेश अरोरा यांनी ‘ गुगल ‘ च्या ब्लॉगवर या प्रकल्पामागची भूमिका स्पष्ट केली आहे. ‘ भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला आम्ही कलात्मकता आणि व्यावसायिकता यांचा उत्सव साजरा करीत आहोत. त्यासाठी स्थानिक पातळीवर कार्यरत असलेल्या आणि जग सुलभ करण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी कार्यरत असलेल्या स्वयंसेवी संस्था शोधून काढण्यासाठी हा उपक्रम राबविला जात आहे ,’ असे अरोरा यांनी म्हटले आहे. 


* गुगल इम्पॅक्ट चॅलेंज इन इंडिया 


>> लोकांचे जीवनमान उंचावण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर कशा प्रकारे करता येईल , हे ना नफा तत्त्वावर चालणाऱ्या स्वयंसेवी संस्थांनी सांगायचे आहे. 
>> सर्वांत शेवटी उत्तम कल्पना मांडणाऱ्या चार संस्थांना प्रत्येकी सुमारे तीन कोटी रुपयांचा ग्लोबल इम्पॅक्ट अॅवॉर्ड. 
>> त्यांच्या कल्पनेतील प्रकल्प प्रत्यक्षात आणण्यासाठी गुगलकडून तांत्रिक साह्य. 
>> ऑनलाइन नोंदणीची अंतिम मुदत : पाच सप्टेंबर २०१३ 
>> जगभरातील गुगल वापरकर्ते सर्व कल्पनांबाबत आपले मत नोंदवतील. 
>> दहा उत्तम प्रकल्पांची घोषणा : २१ ऑक्टोबर २०१३ 
>> राम श्रीराम , जॅकलिन फुलर , अनू आगा , जयंत सिन्हा आणि निकेश अरोरा हे परीक्षक त्या सर्व प्रकल्पांचा अभ्यास करून अंतिम तीन जणांची निवड करतील. 
>> लोकांच्या मतानुसार ‘ फॅन फेव्हरिट ‘ प्रकल्पही निवडला जाईल. 
>> ही प्रक्रिया ३१ ऑक्टोबर रोजी दिल्लीत होईल. 

Exit mobile version