फेसबुक करोडपती! तयार कपड्यांचा व्यवसाय फेसबुकवर

facebookफेसबुकचा वापर फक्त टाइमपास करण्यासाठी होतो ,त्यावरून इतरही काही उद्योग होतात , या चर्चांना फाटा देणारी ही बातमी आहे. अमेरिकेतील ब्रांडा नावाच्या महिलेनं तयार कपड्यांचा व्यवसाय सुरू केला आणि तो फक्त फेसबुकवर पोस्ट करून चालवला आहे. 



सोशल नेटवर्किंग साइट्स हे लोकांना एकत्र आणणारं , जग जवळ आणणारं माध्यम. म्हणजे , असं सांगतात. बऱ्याचदा या साइट्सचा वापर फक्त टाइमपास करण्यासाठी होतो. अनेकजणांचे कित्येक तास फेसबुक किंवा ट्विटरवर जातात. या प्रकारामुळे काही ऑफिसेसमध्ये अशा साइट्सवर बॅनही आला आहे. काही जणांना मात्र सोशल नेटवर्किंग साइट्सचा उत्तम वापर करणं जमतं. अमेरिकतेली ब्रांडी टेम्पल या महिलेनं फेसबुकच्या साहाय्यानं आपला व्यवसाय मोठ्या प्रमाणात वाढवला आहे. ती कपडे तयार करते. तिच्या कंपनीत १६० जण काम करतात. तिचीकंपनी महिन्याला ३० ते ५० हजार कपडे विकते. महत्त्वाचं म्हणजे ही विक्री एखादी शो-रूम किंवा मॉलमधून होत नाही , तर फेसबुकद्वारेच होते. या यशामुळे प्रभावित होऊन एओएलचे सह-संस्थापक स्टीव्ह केस यांनी या कंपनीत दोन कोटी डॉलर्सची गुंतवणूक केली आहे. त्यांच्या मते ही कंपनी एक अब्ज डॉलर्सचा टप्पा गाठू शकते. 


हा व्यवसाय सुरू कसा झाला , ही कथाही रंजक आहे. ब्रांडीला चार मुलं आहेत. आपल्या मुलांसाठी वेगवेगळ्या डिझाइन्सचे कपडे शिवणं हा तिचा छंद होता. एकदा त्यांनी जास्तीचं कापड घेतलं. त्याचे कपडेही शिवले. उरलेल्या कपड्यांचं काय करावं , असा प्रश्न तिच्यासमोर उभा राहिला. मग तिनं ते ड्रेस विकावेत , असा विचार केला. कोणी विकत घेईल की नाही , अशी शंका मनात होती ; पण उलट घडलं. ते सगळे ड्रेस सहजपणे विकले गेले. एवढंच नाही , अधिक मागणीही आली. मग त्यांनी त्यावर विचार केला आणि ऑर्डर स्वीकारणं सुरू केलं. आपली भाची एलिझाबेथ टिसिंगर उर्फ लोली हिच्या नावावरून कंपनीचं नाव ठेवलं लोली ओली डूडल. आपला व्यवसाय इतका मोठा होईल , याची तिलाही कल्पना नव्हती. सुरुवातीला तिनं ईबे या वेबसाइटवरून आपण डिझाइन केलेल्या कपड्यांची विक्री सुरू केली. त्यानंतर एक दिवस फेसबुकवर ती डिझाइन्स टाकली. 


त्या डिझाइन्सला उत्तम प्रतिसाद लाभला. मग दोन आठवड्यांतच तिनं आपल्याकडील सारी डिझाइन्स फेसबुकवर पेस्ट केली. त्यालाही तुफान प्रतिसाद लाभला. त्यानंतर त्यांनी फेसबुकवर डिझाइन्स टाकून विक्रीच्या ऑर्डर्स घ्यायला सुरुवात केली.आज तिच्या कंपनीच्या पेजचे ६ लाख १४ हजारांहून अधिक फॅन आहेत. 


तिच्या या कंपनीत सारे कुटुंबीय सहभागी झालेत. सारेजण मिळून काम करतात. त्यांच्या मित्रांनाही काम देतात. मंदीच्या आणि बेरोजगारीच्या या काळात अशा प्रकारे कंपनी सुरू होणं आणि साऱ्यांनी ती चालवणं ही चांगलीच गोष्ट आहे , असं ब्रांडा म्हणते.

Exit mobile version