ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम , अर्थात जीपीएस ही मोबाईलमधली सुविधा आता आपल्याला नवीन राहिलेली नाही. मात्र ही सुविधा आपल्याला मिळते ती अमेरिकी उपग्रहांवरून. त्यांना टक्कर देण्यासाठी भारतीय अवकांश संशोधन संस्था अर्थात इस्त्रोने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे.
‘ इंडियन रिजनल नेव्हिगेशन सॅटेलाईट सिस्टीम ‘ ( आयआरएनएसएस -१ ) हा उपग्रह तयार करून भारताने उपग्रह यंत्रणेच्या क्षेत्रातही मागे नसल्याचं दाखवून दिलंय. हा उपग्रह १ जुलैला श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अंतराळ स्थानकावरून प्रक्षेपित करण्यात आला. १४२५ किलोग्राम वजनाचा हा उपग्रह भारताचा पहिला दिशादर्शक उपग्रह आहे.
या उपग्रहाला जोडणारी यंत्रणा आपल्याकडे असल्यास आपली जागा आपण अचूक शोधू शकू. रोजच्या जीवनात दिशादर्शक सेवा , दळणवळण , व्यापारात इ. क्षेत्रांत याचा फायदा आहेच. त्यासोबत शत्रूचा अचूक वेध घेणे , क्षेपणास्त्रांना मार्गदर्शन , असे या उपग्रहाचे अनेक लष्करी फायदेही आहेत. याचं धर्तीवरील अजून सहा उपग्रह २०१५ पर्यंत अवकाशात पाठवण्याचा इस्त्रोचा मानस आहे.