नवा गुगल मॅप आला, चला भटकंतीला!

google-mapआपल्या गावातील गल्लीबोळ, घरं, इमारती, इतकंच नव्हे तर अगदी पायवाटाही एका क्लिकसरशी दाखवणारा, घरबसल्या हवं तिथं घेऊन जाणारा, भटकंतीप्रिय मंडळींचा वाटाड्या ठरलेला ‘गुगल मॅप’ आता अधिक आकर्षक आणि लक्षवेधी रूपात दिसणार आहे. हा नकाशा अत्यंत सोप्या पद्धतीनं वापरता येईल आणि तो अधिक प्रभावीपणे ‘मार्गदर्शन’ करेल, असा विश्वास गुगलनं व्यक्त केलाय.



नव्या ‘गुगल मॅप’मधील सर्च बॉक्स हा अधिक सक्षम आहे. जुन्या मॅपमध्ये आपण फक्त एखादं ठिकाणच पाहू शकत होतो. परंतु, या नकाशावर दिशा, ट्रॅफिक अपडेट्स, खानपान सेवेबाबतची माहितीही मिळू शकते. तसंच, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी कोणकोणत्या वाहनांचा वापर करता येईल, हेही एका क्लिकवर कळू शकतं.

maps.google.co.in


मॅपच्या उजव्या बाजूला सर्च बॉक्स देण्यात आला आहे. यात नाव टाइप केल्यास ते ठिकाण दिसू लागेल. यात वेगवेगळे पर्याय देखील देण्यात आले आहेत. छोट्या छोट्या ठिकाणांची देखील माहिती मिळू शकेल. ‘स्टेप बाय स्टेप’ किंवा ‘मोर ऑप्शन अँड टाइम्स’ यावर क्लिक केल्यास प्रवासाला लागणारा वेळ, वाटेतील थांबे याची माहिती मिळू शकेल.


सर्च बॉक्समध्ये ठिकाणाचं नाव टाकून ‘ट्रॅफिक’वर क्लिक केल्यास आपल्याला त्या मार्गावरील ट्रॅफिकची इत्थंभूत माहिती मिळू शकेल. तसेच बस स्टॉप, रेल्वे स्टेशन, मेट्रो स्टेशन हेही तिथल्या तिथे पाहता येणार आहेत.


एखाद्या ठिकाणाचं नाव सर्च केल्यानंतर ‘एक्सप्लॉर धीस एरिया’ या ऑप्शनद्वारे आपल्याला परिसरातील हॉटेल, कॅफे, रेस्टॉरंटची माहिती मिळेल. त्यांचे फोन नंबरही तिथे उपलब्ध असतील. त्यामुळे हा नवाकोरा, चकाचक गुगल मॅप नेटिझन्स आणि ‘भटक्यां’साठी एक फुलप्रूफ टूर पॅकेज ठरेल, असं म्हणायला हरकत नाही.

Exit mobile version