इन्स्टाग्रामवर व्हिडीओ

instagramहॅशटॅगनंतर व्हिडीओ हे फीचर उपलब्ध करून देत फेसबुकने ट्विटरला मोठी स्पर्धा निर्माण केली आहे. त्यामुळे इतके दिवस फोटोसाठी पसंतीचे असलेल्या ‘इन्स्टाग्राम’वर आता व्हिडीओचीही सोय उपलब्ध झाल्याने फेसबुक युजर्समध्ये उत्साह संचारला आहे. यामध्ये सध्या १५ सेकंदाचा व्हिडीओ रेकॉर्ड करता येणार असून सिनेमा या फीचरमध्ये घरच्या कॅमेरावर शूट केलेले व्हिडीओ प्रोफेशनल कॅमेरावरील व्हिडीओंसारखे दिसू शकतात.


फोटोसाठी इन्स्टाग्राम ओपन केल्यावर मूव्ही कॅमेराचा आयकॉन उपलब्ध आहे. त्यावर क्लिक केल्यावर व्हिडीओ मोड ओपन होतो. त्यातून १५ सेकंदांचा व्हिडीओ घेता येतो. या अॅपमध्ये १३ विशेष फिल्टर देण्यात आले असून त्याआधारे व्हिडीओला विविध इफेक्ट देता येतात.

ट्विटरचे विने प्रचंड लोकप्रिय झाल्यानंतर फेसबुकला त्याच्यासारखाच पर्याय आणणे क्रमप्राप्त होते. सध्या १ कोटी ३० लाखांहून अधिक व्यक्तींनी विने डाऊनलोड केले आहे. तर इन्स्टाग्रामला त्याच्या दहापट प्रसिद्धी मिळेल, असा विश्वास फेसबुकने व्यक्त केला आहे. ‘विने’च्या तुलनेत व्हिडीओची दुप्पट लांबी, सिनेमा आणि फिल्टर या फीचर्समुळे फेसबुकला ते शक्यही होईल, असे तज्ज्ञांना वाटते आहे. त्यातच सिनेमा या फीचरमुळे सर्वसाधारण कॅमेरावर काढलेले आणि चालता-फिरता रेकॉर्ड केलेले व्हिडीओदेखील उत्कृष्ट क्वॉलिटीचे दिसणार आहेत. परिणामी होतकरू कॅमेरामनला अधिकाधिक प्रोत्साहन मिळेल.

सध्या इन्स्टाग्रामवर दिवसाला १६ अब्ज फोटो शेअर केले जातात आणि १० लाख लाइक्स केल्या जातात. नव्या फीचरमुळे जाहिरातदारांचाही मोठा फायदा होणार आहे. मे महिन्यात झालेल्या एका सर्वेक्षणानुसार टॉप १००पैकी ६७ ब्रँड इन्स्टाग्रामचा उपयोग करतात. फेब्रुवारीमध्ये ही संख्या ५७ होते. या सर्व ६७ ब्रँडचे एकूण ७० लाख फॉलोअर्स आहेत. ‘नाइके’चे इन्स्टाग्रामवर जवळपास १३ लाख फॉलोअर आहेत. सध्या विने अनेकांच्या पसंतीस उतरले असले तरी इन्स्टाग्राममधील नवीन फीचरमुळे त्यालाही अधिकाधिक युझर्सची पसंती मिळेल. त्यामुळे इन्स्टाग्रामवरील जाहिरातीदारांचीही संख्या वाढेल, यात शंका नाही.

ADVERTISEMENT
Exit mobile version